CSK IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी चेन्नईने विरारमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मराठी खेळाडूला दिली संधी; पृथ्वी शॉच्या नावाची रंगली होती चर्चा
Ayush Mhatre CSK IPL 2025:

Ayush Mhatre CSK IPL 2025: मुंबईचा अवघ्या 17 वर्षांचा सलामीचा फलंदाज आयुष म्हात्रेचा (Ayush Mhatre) आयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) अनुपस्थितीत आयुष म्हात्रेला चेन्नई संघात संधी देण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळं आयपीएलच्या उर्वरित मोसमातून त्याला माघार घ्यावी लागली आहे. आयुष म्हात्रे हा मूळचा विरारचा असून, त्यानं प्रथम दर्जाच्या नऊ आणि लिस्ट एच्या सात सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. (Ayush Mhatre set to replace Ruturaj Gaikwad in CSK)
चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या जागी आयुष म्हात्रेचा संघात समावेश केला आहे. कोपराच्या फ्रॅक्चरमुळे कर्णधार गायकवाड संपूर्ण आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडला होता, त्यानंतर एमएस धोनी संघाचे नेतृत्व करत आहे. चेन्नईकडून काही दिवसांपूर्वी काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या, त्यानंतर संघाने मुंबईचा तरुण सलामीवीर फलंदाज म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉच्या नावाची देखील चर्चा रंगली होती. मात्र ऋतुराज गायकवाडच्या जागी 17 वर्षांच्या मराठी खेळाडूला चेन्नईकडून संधी देण्यात आली आहे. आयुष म्हात्रे येत्या काही दिवसांत चेन्नईच्या संघात सामील होईल. चेन्नईकडून त्याला तातडीने सामील होण्यास सांगितले आहे. आयपीएल लिलावात म्हात्रेची मूळ किंमत 30 लाख रुपये होती, परंतु त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.
🚨 AYUSH MHATRE IN CSK. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 13, 2025
- 17 year old Ayush Mhatre set to replace Ruturaj Gaikwad in CSK. (Cricbuzz). pic.twitter.com/lX55SIQBdd
आयुष म्हात्रे आगामी काही दिवसांत चेन्नईच्या ताफ्यात दिसेल, असं चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. चेन्नई सुपर किंग्ज सध्या त्यांच्या ७ व्या सामन्यासाठी लखनौमध्ये आहेत, जो सोमवारी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाईल. सध्या चेन्नई सुपर किंग्जची परिस्थिती वाईट आहे. चेन्नईने सहा सामने खेळले असून यामध्ये एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. चेन्नईचे सध्या 2 गुण असून गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईचा सलग 5 सामन्यात पराभव झाला. चेन्नईचा सामना 20 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आहे.
कोण आहे आयुष म्हात्रे-
- मुंबईचा आयुष म्हात्रे चेन्नईचा नवा सुपर किंग
- आयुष म्हात्रे हा मूळचा विरारचा
- यंदा इराणी करंडकात खेळून मुंबई संघात पदार्पण
- रणजी पदार्पणात आयुषचं बडोद्याविरुद्ध अर्धशतक
- महाराष्ट्राविरुद्ध रणजी सामन्यात आयुष म्हात्रेची 176 धावांची खेळी
- नागालॅंडविरुद्धच्या लिस्ट ए सामन्यात 117 चेंडूंत 181 धावा
- आयुषच्या नावावर नऊ रणजी सामन्यांत 504 धावांचा रतीब
- आयुषच्या खात्यात सात लिस्ट ए सामन्यांत 458 धावांचा बॅलन्स
- यंदाच्या मोसमात रणजी आणि लिस्ट ए सामन्यांत आयुषची प्रत्येकी दोन शतकं आणि एक अर्धशतक
आयुष म्हात्रेची कारकीर्द-
आयुष म्हात्रेने 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांमध्ये 504 धावा केल्या आहेत, आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट एमध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.
















