(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RR vs RCB : बंगलोरचा राजस्थानवर सनसनाटी विजय; एबी डिव्हिलियर्सची वादळी खेळी निर्णायक
IPL 2020 RR vs RCB : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 13 सीजन मधील 33 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला.
एबी डिव्हिलियर्सच्या वादळी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं राजस्थानवर 7 विकेट्सनी दमदार विजय साजरा केला. या सामन्यात राजस्थाननं बंगलोरसमोर विजयासाठी 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बंगलोरनं हे आव्हान सात विकेट्स बाकी ठेऊन अखेरच्या षटकात पूर्ण केलं. बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा सहावा विजय ठरला.
बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीच्या देवदत् पडिक्कलनं दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचून बंगलोरच्या विजयाचा पाया रचला. पण हे दोघेही लागोपाठ माघारी परतल्यानंतर बंगलोरसमोर संकट उभं ठाकलं होतं. मात्र, या परिस्थितीतून एबी डिव्हिलियर्सनं अवघ्या 22 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी करत बंगलोरचा दणदणीत विजय मिळवून दिला.
स्मिथला सूर गवसला; मॉरिसचा भेदक मारा
नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारुन राजस्थाननंही आपल्या डावात दमदार फलंदाजी केली. सलामीच्या रॉबिन उथप्पानं 22 चेंडूत 41 धावा फटकावल्या. पण बेन स्टोक्स केवळ 15 धावा काढून माघारी परतला. फॉर्मात नसलेला संजू सॅमसनही पुन्हा अपयशी ठरला. त्यानं अवघ्या 9 धावा केला. त्यानंतर आलेल्या कर्णधार स्मिथनं खेळाची सूत्र आपल्या हातात घेत राजस्थानच्या डावाला आकार दिला. स्मिथनं यंदाच्या मोसमातलं तिसरं अर्धशतक साजरं करताना 36 चेंडूत 57 धावा फटकावल्या. तर जोस बटलरनं 24 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे राजस्थानला सहा बाद 177 धावांची मजल मारता आली. बंगलोरकडून ख्रिस मॉरिसनं 26 धावात 4 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहललनं दोन विकेट्स घेतल्या.
IPL 2020, DCvsCSK : धीम्या पिचवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध दिल्लीचा कस लागणार
राजस्थाननं पाचव्यांदा सलामीची जोडी बदलली
आजच्या सामन्यात रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स राजस्थानकडून सलामीला आले. यंदाच्या मोसमात नऊ सामन्यात राजस्थाननं रॉयल्सनं पाचव्यांदा सलामीची जोडी बदलली. याआधी स्टीव्ह स्मिथ आणि यशस्वी जैसवाल, स्मिथ आणि बटलर, बटलर आणि जैसवाल आणि स्टोक्स आणि बटलरनं सलामी दिली होती.