(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 : सूर्यकुमार भविष्यातील स्टार ; 9 वर्षांपूर्वीच रोहित शर्माची भविष्यवाणी
IPL 2020 : चाहते आणि माजी खेळाडूंकडून सूर्यकुमारचं कौतुक होत असून त्याची भारतीय संघात निवड करण्यासंदर्भात बोलंल जात असलं तरिदेखील भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने तर यासंदर्भातील भविष्यवाणी 9 वर्षांपूर्वीच केली होती.
IPL 2020 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासूनच मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव चर्चेत आहे. कारण ऑस्ट्रेलियासोबत खेळवण्यात येणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेसाठी सूर्यकुमारची निवड करण्यात आलेली नाही. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरोधात त्याने केलेल्या नाबाद 79 धावांची खेळीनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीला सर्वच स्तरांतून टीकेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सूर्यकुमार यादव गेल्या तीन वर्षांपासून सतत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी धमाकेदार खेळी करत आहे. त्याचसोबत डोमेस्टिक क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी करत आहे. परंतु, तरिदेखील अद्याप त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आलेली नाही. यासंदर्भात भारतीय संघातील माजी क्रिकेटरही प्रश्न उपस्थित करत आहेत.
चाहते आणि माजी खेळाडूंकडून सूर्यकुमारचं कौतुक होत असून त्याची भारतीय संघात निवड करण्यासंदर्भात बोलंल जात असलं तरिदेखील भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने तर यासंदर्भातील भविष्यवाणी 9 वर्षांपूर्वीच केली होती. रोहितने 9 वर्षांपूर्वी सूर्यकुमार भविष्यातील स्टार असल्याची भविष्यवाणी केली होती.
भारताचा स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचं 9 वर्षांपूर्वीचं एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये रोहितने सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं होतं. सूर्यकुमार भविष्यातील स्टार असल्याचं सांगितलं होतं. रोहितने हे ट्वीट बीसीसीआय अवॉर्ड संपल्यानंतर चेन्नईमध्ये केलं होतं.
रोहित शर्माने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'आताच चेन्नईमध्ये बीसीसीआय अवॉर्ड संपन्न झाले. काही शानदार खेळाडू येणार आहेत. मुंबईच्या सूर्यकुमार यादवला तुम्ही भविष्यात पाहाल.'
Just got done with BCCI awards here in chennai..some exciting cricketers coming up..Suryakumar yadav from Mumbai to watch out for in future!
— Rohit Sharma (@ImRo45) December 10, 2011
दरम्यान, सूर्यकुमार गेले तीन वर्ष आयपीएलमध्ये सातत्यानं चांगलं प्रदर्शन करत आहे. आयपीएल 2020 मध्येही सूर्यकुमारने मुंबईसाठी धमाकेदार खेळी केली आहे. या सीझनमधील 12 सामन्यांमध्ये त्याने 40.22 च्या सरासरीने आणि 155.36 या स्ट्राइक रेटने 362 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने धमाकेदार 48 चौकार आणि आठ षटकार फटकावले आहेत. त्याचं हे प्रदर्शन पाहता अनेक विदेशी खेळाडूही त्याचं कौतुक करत आहेत. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्कॉट स्टायरिसने तर त्याला न्यूझीलंडमधून खेळण्याचीही ऑफर दिली आहे.
रॉयल चॅलेंजर बंगलोर विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवची उत्कृष्ट फलंदाजी पाहिल्यानंतर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर स्कॉट स्टायरिसने ट्वीट करत म्हटलं की, 'जर सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर परदेशात येऊ शकतो. कदाचित न्यूझीलंडमध्येही..."
दरम्यान, मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 5 विकेटने पराभव केला. मुंबई विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. बंगलोरने दिलेलं 165 धावांचं लक्ष्य मुंबईने 19.1 षटकात पूर्ण करत विजय नोंदवला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 79 धावांनी नाबाद निर्णायक खेळी केली होती. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांवर 79 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या :