(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 KXIP vs RCB: पंजाबच्या केएल राहुलनं झळकावलं यंदाच्या मोसमातलं पहिलं शतक
केएल राहुलने दोन धावा काढल्या आणि सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरला. आयपीएलच्या 60 व्या डावात राहुलने हा विक्रम केला.
IPL 2020 KXIP vs RCB: आयपीएल 2020 चा सहावा सामना दुबईमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने यंदाच्या मोसमातील पहिलं शतक झळकावलं. टी -20 क्रिकेटमधील हे राहुलचे चौथे आणि आयपीएलमधील दुसरं शतक आहे. राहुलच्या शानदार खेळीमुळे पंजाबने बंगलोरला 207 धावांचं लक्ष्य दिलं.
राहुलच्या अखेरच्या 15 चेंडूत 55 धावा
राहुलने पहिल्या 54 चेंडूत 77 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या 15 चेंडूंमध्ये राहुल तडाखेबाज खेळी करत 55 धावा काढल्या. राहुल 69 चेंडूत 132 धावा करत नाबाद राहिला. राहुलने आपल्या खेळीत 14 चौकार आणि सात षटकार ठोकले. राहुलच्या या तुफानी डावामुळे पंजाबने शेवटच्या चार षटकांत 74 धावा केल्या.
केएल राहुल सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज
केएल राहुलने सामन्यात दोन धावा काढल्या आणि तो सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरला. आयपीएलच्या 60 व्या डावात राहुलने हा विक्रम केला. याआधी आयपीएलमध्ये वेगवान 2,000 धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 63 डावात हा पराक्रम केला होता. आता राहुलने 60 डावांमध्ये 2 हजार धावा करून सचिनला मागे टाकलं आहे.
ख्रिस गेलच्या नावावर वेगवान 2,000 धावांचा विक्रम
ख्रिस गेलच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावांचा विक्रम आहे. गेलने केवळ 48 डावांमध्ये ही कामगिरी केली. या यादीत पंजाबकडून खेळलेला शॉन मार्श दुसर्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजाने 52 डावात हे कामगिरी केली. तर राहुल आयपीएलमध्ये 2,000 हजार धावा करणारा वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे.