मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 40 धावांनी धुव्वा, मुंबईची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप
मुंबई इंडियन्सकडून हार्दिक आणि कृणाल पंड्यानं अवघ्या 26 चेंडूत 54 धावांची भागीदारी रचली. हार्दिकनं 15 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह 32 धावा फटकावल्या.
दिल्ली : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 40 धावांनी धुव्वा उडवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधला हा सहावा विजय ठरला. या सामन्यात मुंबईनं दिल्लीसमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईच्या भेदक आक्रमणासमोर दिल्लीला नऊ बाद 128 धावांचीच मजल मारता आली.
दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर पृथ्वी शॉने 20, अक्षर पटेलने 26 धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरनं 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जसप्रीत बुमरानं दोन तर लसिथ मलिंगा आणि कृणाल पंड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी पंड्या बंधूंनी अखेरच्या षटकांत केलेल्या हाणामारीमुळे मुंबई इंडियन्सनं 20 षटकांत पाच बाद 168 धावांची मजल मारली. दिल्लीच्या अचूक माऱ्यासमोर पहिल्या 15 षटकांत मुंबईच्या 104 धावाच धावफलकावर लागल्या होत्या. पण त्यानंतर हार्दिक आणि कृणाल पंड्यानं अवघ्या 26 चेंडूत 54 धावांची भागीदारी रचली.
हार्दिकनं 15 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह 32 धावा फटकावल्या. तर कृणालनं 36 धावांची खेळी केली. त्याआधी क्विंटन डी कॉकनं 35 तर रोहित शर्मानं 30, सूर्यकुमार यादवने 26 धावांचं योगदान दिलं. दिल्लीकडून रबाडाने 2 तर अमित मिश्रा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.