(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDW vs NZW 3rd ODI Live: भारतासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान; तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडसमोर 280 धावांचं आव्हान
INDW vs NZW:न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर 280 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं शेफाली वर्मा, मेघना आणि दिप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या बळावर 279 धावा केल्या आहेत
INDW vs NZW: न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघ दोन सामने गमावल्यानं अडचणीत सापडला आहे. आज, शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर 280 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं शेफाली वर्मा, मेघना आणि दिप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या बळावर 279 धावा केल्या आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असलेल्या भारतासमोर आता करो वा मरो अशी स्थिती आहे.
भारतीय संघानं आव्हानात्मक धावसंख्या उभारली असून आतापर्यंत न्यूझीलंडच्या दोन विकेट्स देखील गेल्या आहेत. मेघना आणि शेफालीनं भारताला दमदार सुरुवात करुन दिली. मेघनानं 41 चेंडूत 31 धावा केल्या तर शेफालीनं 57 चेंडूत 51 धावा केल्या. तर दिप्तीनं शेवटपर्यंत किल्ला लढवत नाबाद 69 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा खिताब प्राप्त केलेली स्मृती मानधना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी संघात पुन्हा सामील होण्याची शक्यता होती. मात्र ती आजही खेळू शकली नाही. झुलन गोस्वामी मात्र संघात परतली आहे. मानेचं दुखणं वाढल्यानं ती दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर होती.
दुसरी वनडे फलंदाजांमुळे नाही तर गोलंदाजीमुळे गमवावी लागली होती. 271 धावांच्या भक्कम लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरल्याने गोलंदाजांकडून निराशा झाली होती.
हरमनच्या फॉर्मची चिंता
T20 कर्णधार हरमनप्रीत कौरने 2017 विश्वचषकापासून एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ दोनदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. संघाला तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. सध्याच्या मालिकेत तिने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या सामन्यात त्याने नऊ षटके टाकली होती. मात्र फलंदाजीत तिच्याकडून अपेक्षा आहेत. आजही ती केवळ 13 धावाच करु शकली.
असा आहे संघ
भारत : एस मेघना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्रकार, सिमरन बहादुर, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, स्नह राणा, मेघना सिंह, तानिया भाटिया, रेणुका सिंह, स्मृति मानधना आणि झूलन गोस्वामी
न्यूझीलंड : सोफी डिवाइन, सूजी बेट्स, अमेलिया केर, अॅमी सेटरथवेट (कर्णधार), मॅडी ग्रीन, केटी मार्टिन, ब्रुक हॉलिडे, हेले जेनसेन, जेस केर, रोजमेरी मायेर, फ्रेंन जोनास, लिया ताहुहु, लॉरेन डाउन, फ्रांसिस मॅकाय आणि हॅना रोवे