ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून मायदेशी येताच मोहम्मद सिराजनं खरेदी केली luxury कार
ऑस्ट्रेलियाविरोधातील क्रिकेट मालिकेच्या निमित्तानं त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 13 विकेट आपल्या नावे केले

हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक युवा खेळाडूनं (Ind Vs Aus) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये एक वेगळीच आणि अविस्मरणीय छाप सोडली. आंतरराष्ट्रीय पातळीवरव अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये या युवा खेळाडूंचं जबाबदारपणे वागणं, तितक्याच दमदार खेळाचं प्रदर्शन करणं याचीच चर्चा अद्यापही सुरु आहे. किंबहुना ती अनेक वर्षे सुरुच राहील. अशाच चर्चांमध्ये एक नावही अनेकांचं लक्ष वेधत आहे. हे नाव आहे, मोहम्मह सिराज या भारताच्या वेगवान गोलंदाजाचं.
वडिलांची साथ आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरच सुटली आणि त्याच्या जीवनात वादळ आलं. पण, त्यातही तो पाय रोवून उभा राहिला. मायदेशी परतल्यानंतर इतर कोणाच्या भेटीला जाण्याआधी त्यानं वडिलांची कबर गाठत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सिराज भारतात आला, त्यावेळी अर्थातच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. या साऱ्यामध्ये त्यानंही स्वत:साठी एक खास भेट खरेदी केली.
ही भेट म्हणजे एका आलिशान आणि लक्झरी कारची. ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर सिराजनं निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू (BMW) ही महागडी कार खरेदी केली. "Alhamdullilah'' म्हणजेच अल्लाहच्या कृपेनं.... असं लिहित त्यानं सोशल मीडियावर याचा एक लहानसा व्हिडीओ पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला. स्वत:ची कार खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यातही त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठीच्या मेहनतीची इतकी सुरेख आठवण असेल तर, जीवनातील हे क्षण म्हणजे दुग्धशर्करा योगच.
Ind vs Aus मालिकेनंतर मायदेशी परतताच वडिलांच्या कबरीपाशी पोहोचला स्टार गोलंदाज सिराज

वयाच्या 26 व्या वर्षी सिराजनं भारतीय कसोटी संघात स्थान मिळवलं. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या दुखापतग्रस्त होण्यानं संघाच्या सिराजकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या आणि त्यानं ऑस्ट्रेलियामध्ये आपल्यावर असणारा संघाचा, कर्णधाराचा आणि असंख्य क्रीडारसिकांचा विश्वास सार्थ ठरवला.























