Ind vs Aus मालिकेनंतर मायदेशी परतताच वडिलांच्या कबरीपाशी पोहोचला स्टार गोलंदाज सिराज
प्रत्येक खेळाडूनं मायदेशी परतल्यानंतर कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत केला. सिराजनंही असंच काहीसं केलं. पण, काहीशा वेगळ्या अंदाजात.
Ind vs Aus सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर यजमान संघालाच पराभूत करत भारतीय क्रिकेटपटूंनी एक इतिहास रचला. असंख्य अपेक्षांचं ओझं पाठीवर घेऊन मैदानात उतरलेल्या या संघानं दमदार कामगिरी केली. ज्यानंतर सर्वच स्तरांतून संघातील प्रत्येक खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान या विजयी प्रवासामध्ये तितकंच महत्त्वाचं ठरलं. पण, त्यातही काही नावं विशेष चमकली. मोहम्म्द सिराजही (Mohammed Siraj) त्यापैकीच एक.
चौथ्या आणि निर्णायक अशा ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंना बाद करण्याची किमया करणाऱ्या सिराजनं त्याची वेगळी छाप सोडली. ऑस्ट्रेलियातील विजयानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले. ज्यानंतर प्रत्येकाचं जंगी स्वागत करण्यात आलं. प्रत्येक खेळाडूनं मायदेशी परतल्यानंतर कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत केला. सिराजनंही असंच काहीसं केलं. पण, काहीशा वेगळ्या अंदाजात.
हैदराबादमध्ये दाखल होताच, तो थेट वडिलांच्या कबरीपाशी पोहोचला. वडिलांच्या कबरीजवळ उभं राहत तिथं गुलाबपुष्पांची चादर चढवत दुआ मागणाऱ्या सिराजचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पुन्हा एकदा वडिलांशी असणारं त्याचं सुरेख नातं या निमित्तानं सर्वांसमोर हळुवारपणे उलगडलं.
Varun Dhawan Wedding | अलिबागमध्ये 'या' आलिशान रिसॉर्टवर पार पडणार वरुण- नताशाचा विवाहसोहळा
हैदराबादमध्ये आल्यावर आपण थेट वडिलांच्या कबरीपाशी गेलो, त्यावेळी मनात भावनांचा काहूर माजला होता, असं खुद्द सिराज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला.
वडिलांच्या निधनाच्या वेळी कुटुंबापासून दूर होता सिराज
2020 मध्ये नोव्हेंबर महिन्यात मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं होतं. यावेळी तो भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. कोरोना महामारीमुळं लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळं त्यानं मायदेशी न परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतल्यास तो पूर्ण मालिकेलाच मुकणार होता. जीवनातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर त्याला हा कठीण निर्णय़ घ्यावा लागला होता. ऑस्ट्रेलियातच राहून त्यानं आपल्या मुलानं देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करण्याची इच्छा मनी बाळगणाऱ्या वडिलांचं स्वप्नच जणू पूर्ण केलं.