IND Vs SA : देवाला साकडं, मैदानात शांतता अन् हार्दिकच्या हातात चेंडू, शेवटच्या षटकातला अंगावर काटा आणणारा बॉल टू बॉल थरार!
Hardik Pandya : टीम इंडियाने टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या विजयात हार्दिक पंड्याने मोलाची कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचे सगळीकडे कौतुक होत आहे.
India Vs South Africa 2024 Final Match : टी-20 विश्वचषकावर टीम इंडियाने आपलं नाव कोरलं आहे. कोट्यवधी लोकांचे स्वप्न रोहित शर्माच्या ब्रिगेडने पूर्ण केलं. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचं लक्ष ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेला मात्र ही धावसंख्या गाठता आली नाही. शेवटच्या षटकात सर्वांनी श्वास रोखून धरला होता. कारण याच षटकात भारताचा पराभव होणार की विजय हे ठऱणार होतं. हार्दिक पंड्याने मात्र शेवटच्या षटकात दमदार कामगिरी करत भारताला विजयापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं.
पहिल्या दोन चेंडूंत नेमकं काय घडलं?
शेवटच्या षटकात दोन्ही संघांनी जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. म्हणूनच हा सामना मोठा थरारक झाला. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूत हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलरला झेलबाद केलं. डेव्हिड मिलर बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 161 धावा झाल्या होत्या. तर आफ्रिकेचे एकूण सात गडी बाद झाले होते. त्यानंतर आफ्रिकेला जिंकण्यासाठी 17 धावा होत्या. दुसऱ्या चेंडूवर कसिगो रबाडाने हार्दिकला चौकार मारला.
शेवटचा चेंडू फक्त औपचारिकता
त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एक-एक धाव चोरली. पाचव्या चेंडूवर मात्र हार्दिकने कसिगो रबाडाला तंबूत परत पाठवलं. कसिगो रबाडा झेलबाद झाल्यानंतर भारताने हा सामना जिंकला होता. शेवटचा चेंडू फक्त औपचारिकता म्हणून टाकण्यात आला. या शेवटच्या चेंडूत एनरिच नॉर्टजने एक धाव केली. आणि भारताचा सात धावांनी विजय झाला.
11 वर्षांचा दुष्काळ संपला
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 17 वर्षानंतर भारतानं पुन्हा एकदा टी 20 विश्वचषक जिंकला आहे. या विजयासाह 11 वर्षानंतर भारताचा आयसीसी ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपाल आहे.
दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य
नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरवात चांगली झाली नाही. कर्णधार आणि सलामीवर रोहित शर्मा फक्त 9 धावा करू शकला. विराट कोहलीने मात्र एकट्याने टीम इंडियाला सांभाळले. त्याने 59 चेंडूंमध्ये 6 चौकार, 2 षटकार यांच्या मदतीने 76 धावा केल्या. दुसरीकडे ऋषभ पंतला खातंदेखील खोलता आलं नाही. सूर्यकुमार यादवही अवघ्या तीन धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने मात्र विराट कोहलीला साथ देत चार षटकार आणि एक चौकार यांच्या मदतीने 31 चेंडूंत 47 धावा केल्या. शिवम दुबेनेही 16 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. हार्दिक पांड्याने पाच तर रविंद्र जडेजाने दोन धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले.
दक्षिण आफ्रिकेने केल्या 169 धावा
दक्षिण आफ्रिकेने मात्र ही धावसंख्या गाठण्यासाठी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्यांचा रझा हेन्ड्रिक्स हा सलामीवीर फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने फक्त चार धावा केल्या. क्विंटन डी कॉकने मात्र 31 धावा करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. कर्णधार ऐडन मर्कर यालाही फक्त चार धावा करता आल्या. ट्रिस्टॅन स्टब्सने 21 चेंडूत 31 धावा केल्या. हेनरिच क्लासनेने मात्र 52 धावांची खेळी करत भारताला आडचणीत आणले होते. त्याने ही धावसंख्या अवघ्या 27 चेंडूमध्ये केली. पण त्याला हार्दिक पांड्याने झेलबाद केले. डेव्हिड मिलरही हार्दिक पांड्याच्या चेंडूवर 21 धावांवर झेलबाद झाला. मार्को जानसेने फक्त दोन धावा करू शकला. केशव महाराज (2), कसिगो रबाडा (4) हे तिन्ही खेळाडू खास कामगिरी करू शकले नाहीत.