(Source: ECI/ABP News/ABP Majha)
..तोपर्यंत पाकशी क्रिकेट नाहीच, भारताने ठणकावलं!
नवी दिल्ली: सीमेपलिकडून भारतात होणारे दहशतवादी हल्ले जोवर थांबत नाहीत, तोवर भारत आणि पाकिस्तानमधल्या द्विपक्षीय क्रिकेट सामन्यांना केंद्र सरकारकडून परवानगी मिळणार नाही, असं केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी नवी दिल्लीत ठासून सांगितलं.
आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत-पाकिस्तान सामन्यांना मात्र केंद्र सरकारची हरकत नसेल, हेही गोयल यांनी स्पष्ट केलं.
बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुबईत होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी केलेल्या विधानाला खूप मोठा अर्थ आहे.
बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये उभयपक्षी क्रिकेट मालिका खेळवण्याबाबत 2012 साली परस्परसामंजस्य करार झाला होता. पण बीसीसीआयनं या करारानुसार पाकिस्तानशी खेळण्यास सातत्यानं नकार दिला आहे. त्यामुळं पीसीबीनं बीसीसीआयकडून सहा कोटी अमेरिकन डॉलर्स नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि पीसीबीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे.