Ind vs Aus | भारतीयांना कमी लेखण्याची चूक कधीही करु नका, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचं सूचक वक्तव्य
ऑस्ट्रेलियाच्याच भूमीत जाऊन यजमान संघाला मात देत क्रिकेट मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असतानाच खुद्द ऑस्ट्रेलिय़ाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनीही अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं.
Ind vs Aus सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडे 0-1 अशी आघाडी असताना कसोटी मालिकेमध्ये भारतानं बरोबरी साधत आणि पुढं यजमानांचाच पराभव करत 2-1नं मालिका खिशात टाकणं, या साऱ्याची क्रीडा विश्वात प्रशंसा होत आहे. खुद्द ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक (Justin Langer ) जस्टीन लँगर यांनीही भारतीय संघाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.
चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात विजय मिळावल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. संघाचा हा विजय अतुलनीय असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचंही म्हणणं.
ऑस्ट्रेलियाचा संघ हा त्यांच्या आक्रमक शैलीसाठी, स्लेजिंगसाठी क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरतो. पण, याच संघाच्या प्रशिक्षकांनी भारतीय युवा खेळाडूंचं, प्लेइंग इलेव्हनचं आणि सर्वच भारतीयांचं केलेलं कौतुक सध्या त्यांनाही इतरांच्या 'फेव्हरेट लिस्ट'मध्ये आणून ठेवत आहे. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताकडून पराभूत झाल्यानंतर लँगर यांनी अतिशय सुरेख शब्दांत आपण, नेमकं या संघाकडून काय शिकलो याचा खुलासा केला.
'भारतालाच या (विजयाचं) साऱ्याचं श्रेय जातं. आम्ही यातून खुप काही शिकलो. तुम्ही कोणतीही गोष्ट हलगर्जीपणानं घेऊ शकतच नाही. मुळात कधी म्हणजे कधीच भारतीयांना कमी लेखू नका', असं म्हणत कोट्यवधींच्या लोकसंख्येतून भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं ही बाब किती मोठी आहे, याचं महत्त्वं त्यांनी अधोरेखित केलं. भारतीयांचं, भारताचं कौतुक करु तितकं कमीच अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया लँगर यांनी दिली.
🗣 "Pant's innings reminded me a bit of Ben Stokes at Headingley actually. 🗣 "You can never take anything for granted. Never ever underestimate the Indians." - Justin Langer talks to @haydostweets about the series #AUSvIND pic.twitter.com/lnbnjqWjmg
— 7Cricket (@7Cricket) January 19, 2021
(Gabba Test)मध्ये अखेरचा विजयी फटका लगावणाऱ्या ऋषभ पंत याचंही त्यांनी कौतुक केलं. त्याची खेळी पाहून आपल्याला बेन स्टोक्सच आठवल्याचं म्हणत त्याच्या निर्भीड खेळीकडे लँगर यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. शिवाय, या कामगिरीसाठी त्याचं पुढंही कौतुक होत राहील अशा शब्दांत या खेळाडूची पाठ त्यांनी थोपटली.
View this post on Instagram
लँगर यांची ही प्रतिक्रिया क्रीडारसिकांसोबतच असंख्य भारतीयांचीही मनं जिंकून गेली आहे. अनेक क्रिकेटपटूंनीही त्यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या या खिलाडूवृत्तीला दाद दिली.