(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Zealand vs Sri Lanka : श्रीलंकन शेपटाची वळवळ नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार? टीम इंडियाचा सेमीफायनल भिडू होणार तरी कोण??
महिष तिक्ष्णाने 91 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. दिलशान मधुशंकाने 48 चेंडूत 19 धावा केल्या. अखेरच्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी झाली.
बंगळूर : श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा संघ 46.4 षटकांत सर्वबाद 171 धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाचे खेळाडू ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. श्रीलंकेला पहिला झटका 3 धावांवर बसला. श्रीलंकेचा दुसरा फलंदाज 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
कुसल परेराचे अर्धशतक, पण इतर फलंदाजांचा फ्लॉप शो
श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक धावा केल्या. कुसल परेराने 28 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. सलामीवीर पथुम निशांकने 8 चेंडूत 2 धावा केल्या. कुसल मेंडिस 7 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. सदिरा समरविक्रमा 1 धावेवर बाद झाला. चरित असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा आणि चमिका करुणारत्ने यांनी अनुक्रमे 2, 16, 19 आणि 6 धावांचे योगदान दिले. श्रीलंका संघाचे 7 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत.
श्रीलंकन तळाच्या फलंदाजांचे योगदान
मात्र, खालच्या फळीतील फलंदाज महिष तिक्षिनाने संघर्ष केला. महिष तिक्ष्णाने 91 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. दिलशान मधुशंकाने 48 चेंडूत 19 धावा केल्या. महिष तिक्षीना आणि दिलशान मधुसंका यांच्यात अखेरच्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे श्रीलंकेचा संघ 171 धावांपर्यंत मजल मारू शकला. एकेकाळी श्रीलंकेचा संघ दीडशे धावांचा टप्पा पार करू शकणार नाही असे वाटत होते.
श्रीलंकेच्या फलंदाजांनी किवी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले
न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने श्रीलंकेच्या 3 खेळाडूंना बाद केले. याशिवाय लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. टीम साऊदीला एक यश मिळाले. न्यूझीलंडसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर किवी संघ श्रीलंकेचा पराभव करण्यात यशस्वी ठरला तर उपांत्य फेरी गाठणारा तो चौथा संघ बनू शकतो. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या आशा पल्लवित होतील. मात्र, श्रीलंकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
न्यूझीलंडचे 8 सामन्यांत 8 गुण आहेत, या संघाने 4 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेच्या संघाने 8 सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आहेत, तर 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड 8 सामन्यांत 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या