(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Sachin | जेव्हा सचिन तेंडुलकरला एका टॅक्सी चालकानं शिकवलेली क्रिकेटची A B C D
मास्टर ब्लास्टर म्हणा, भारतरत्न म्हणा किंवा मग आपला सचिन म्हणा. क्रिकेट विश्वात अनेक मैलाचे दगड प्रस्थापित करणाऱ्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस.
Happy Birthday Sachin मास्टर ब्लास्टर म्हणा, भारतरत्न म्हणा किंवा मग आपला सचिन म्हणा. क्रिकेट विश्वात अनेक मैलाचे दगड प्रस्थापित करणाऱ्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस. सोशल मीडिया, क्रीडा वर्तुळ, कलाविश्व इतकंच नव्हे तर राजकीय वर्तुळातूनही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. क्रिकेट जगतावर अधिपत्य गाजवणाऱ्या याच सचिनच्या जीवनात आजवर असे काही प्रसंग घडले, जे कायमच चाहत्यांमध्ये कुतूहल आणि आकर्षणाचा विषय ठरतात. अशाच प्रसंगांपैकी एक अशी घटना आहे, जेव्हा सचिननं चक्क एका टॅक्सी चालकाकडून या खेळातील A B C D शिकली होती.
भारतीय संघ एकदा वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सर्व खेळाडू सामन्याच्या तीन दिवसांपूर्वी Port of Spain येथे पोहोचले होते. तिथं संघाचं सराव सत्र संपल्यानंतर सचिन दुपारच्या जेवण्यासाठी बाहेर निघाला. माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता आणि सलामीचा फलंदाज एसएस दास यांनीही सचिनला साथ दिली. हॉटेलच्या लॉबीमध्ये आल्यानंतर त्यांनी एक टॅक्सी केली. सचिन पुढं, चालकाच्या शेजारी बसला, तर इतर दोन खेळाडू मागच्या आसनावर बसले.
दीप दासनंच या प्रसंगाची माहिती दिल्याचं वृत्त एबीपी न्यूजनं प्रसिद्ध केलं होतं. टॅक्सीमध्ये बसलं असता बाहेरच्याच दिशेनं तोंड करुन बसलेल्या सचिननं चालकाला विचारलं, इथला लोकप्रिय खेळ कोणता?, त्याच्या या प्रश्नावर क्रिकेट, असं उत्तर चालकानं दिलं. सचिननं त्यावेळी आपण अमेरिकेहून आल्याचं सांगत म्हटलं, 'आम्ही पिचर, कॅचर, बॅटर असे शब्द ऐकले आहेत. क्रिकेट आणि बेसबॉलमध्ये काही साम्य आहे का?'. सचिननं मोठ्या विनोदी अंदाजात चालकाला प्रश्न विचारणं सुरु ठेवलं. पण, त्यानं हे मनावर घेत फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू म्हणजे काय अशी सर्वच लहानसहान माहिती या खेळाडूंना देण्यास सुरुवात केली. त्याला याचा अंदाजही नव्हता की हे भारतीय संघातील खेळाडू आहेत. त्यातही सचिन बाहेरच्या दिशेनं तोंड करुन बसल्यामुळं त्यानं लगेचच त्याला ओळखलंही नव्हतं. चालक माहिती देत असताना सचिनही ती मोठ्या कुतूहलानं ऐकत होता.
क्रिकेटपटूंच्या खराब कामगिरीवरुन त्यांच्या पत्नी-गर्लफ्रेंडही होतात ट्रोल!
दरम्यानच सचिननं टॅक्सी चालकाला जगभरातील तुमचा आवडता फलंदाज कोण, असा प्रश्न विचारला. क्षणार्धातच सचिनला त्याचं उत्तर मिळालं. भारतीय संघातील सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज संघातील ब्रायन लारा अशा दोन खेळाडूंची नावं त्यानं घेतली होती. एसएस दास तोपर्यंच चालकाला, अरे तू खुद्द सचिनच्याच शेजारी आहेस असं सांगण्यात उतावळा होत असताना सचिननं त्याला थांबवलं.
पैसे देण्याच्या वेळीसुद्धा सचिन बाहेरच पाहत होता, त्यानंतर तो लगेचच टॅक्सीतून बाहेर आला. हा वीस मिनिटांचा प्रवास तिन्ही खेळाडूंना कायमच लक्षात राहील असा होता.