ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल संघाला घेऊन मैदानात, समोर घानाचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
Fifa World Cup 2022 : जगातील बहुतांश फुटबॉल प्रेमींचं लक्ष यंदाच्या विश्वचषकात मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांवर असून आज रोनाल्डो आपला पहिला सामना खेळणार आहे.
Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेला (Fifa World Cup) थाटामाटात सुरुवात झाली असून अगदी रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. पण संपूर्ण जगाचं खासकरुन भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलेल्या मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या संघाचे सामने सर्वासाठीच एक चर्चेचा विषय आहेत. त्यात मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियानं 2-1 ने मात दिली. ज्यानंतर आज ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल संघाला घेऊन आज मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर घाना संघाचं आव्हान असणार आहे.
आज होणाऱ्या या सामन्याचा विचार केल्यास अर्थातच रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचं आव्हान तगडं आहे. कारण ताज्या फिफा क्रमवारीत पोर्तुगाल नवव्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, घानाचा संघ तब्बल 61 व्या स्थानी आहे. पण सौदी अरेबियाने अर्जेंटिना संघाला मात देत एक मोठा उलटफेर झाल्यानं आजच्या सामन्यातही पोर्तुगाल संघाला सावध खेळ करुन आपला विजय पक्का करावा लागणार आहे. त्यात 37 वर्षीय रोनाल्डोचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो, तो निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याने स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा रोनाल्डो आणि टीमचा मनसुबा असणार आहे.
कोणत्या खेळाडूंवर असेल नजर?
सध्या जगातील सर्वात अव्वल दर्जाचा खेळाडू रोनाल्डो (Ronaldo) मैदानात असताना अर्थातच अनेकांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत. पण पोर्तुगाल संघात बर्नार्डो सिल्वा (bernardo silva), ब्रुनो फर्नांडीस (bruno fernandes) या स्टार खेळाडूंवरही सर्वांची नजर असेल. तर डिफेन्समध्ये अनुभवी पेपेला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असती. घानाकडे थॉमस पार्टी (thomas partey) आणि मोहम्मद कुदुससारखे (mohammed kudus) खेळाडू आहेत ज्यांनी युरोपियन क्लबसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पोर्तुगालला या खेळाडूंबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
कसा आहे आजवरचा इतिहास?
दोन्ही संघांमधील आतापर्यंत झालेल्या एकच सामना झाला आहे. 2014 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजमध्ये ते आमने-सामने आले होते. सामन्यात 80 व्या मिनिटाला रोनाल्डोने उत्कृष्ट गोल करत 2-1 ने सामना जिंकवून दिला. पण दोघांपैकी एकही जण पुढील फेरीत जाऊ शकला नाही. ज्यानंतर आता पुन्हा एकदा दोघेही आमने-सामने येणार आहेत.
कधी, कुठे पाहाल सामना?
आजचा हा पोर्तुगाल विरुद्ध घाना सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
हे देखील वाचा-