Fifa World Cup 2022 : भारतातही फिफाची क्रेझ, सुरुवातीच्या 48 सामन्यांतील दर्शकसंख्या 42 दशलक्ष पार, ब्राझीलचा सामना ठरला सर्वाधिक पसंतीचा
FIFA WC 2022 : फिफा विश्वचषक आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होत आहे.
Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धा (Fifa WC) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपले असून एकूण चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या चार संघामध्ये आता उपांत्य फेरीचे सामने सुरु होणार आहेत. दरम्यान फिफा विश्वचषकाची क्रेझ संपूर्ण जगभरात असते, यंदाही बरेच देश या महास्पर्धेचा आनंद उचलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे भारतातही दिवसेंदिवस फुटबॉलची वाढती क्रेझ पाहायला मिळत असून यंदा फिफा विश्वचषकाला भारतात कमालीचा प्रतिसाद मिळाला आहे. विश्वचषकातील सुरुवातीच्या 48 सामन्यांचा विचार केला असता भारतातील प्रेक्षकसंख्या तब्बल 42.2 दशलक्ष इतकी पाहायला मिळाली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने बार्ककडून (BARC) आलेल्या माहितीच्या आधारावर ही दर्शकसंख्या समोर आली आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी भारतातील TVR अर्थात प्रेक्षकांकडून आलेली टीव्ही रेटिंग दिवसेंदिवस वाढते आहे. स्पोर्ट्स 18 चॅनेलवर सामने प्रक्षेपित होत असून जिओ सिनेमा (jio Cinema) अॅपवर लाईव्ह पाहता येतात. त्यामुळेच फिफाचा अधिकृत स्ट्रीमिंग पार्टनर Jio Cinema अॅपने 5 डिसेंबरपर्यंत 1. 1 अब्जपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. भारतात फुटबॉलचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. खासकरुन आपल्या आवडत्या स्टार खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या देशांचे सामने फुटबॉलप्रेमी पाहतात. यामध्ये मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा, रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचा तसंच नेमारच्या ब्राझील संघाचा समावेश होतो. त्यामुळे या संघाचे सामने मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. भारतात यंदा खासकरुन ब्राझीलचे सामने सर्वाधिक पाहिले गेले, यामध्ये 28 नोव्हेंबरला झालेला ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड (Brazil vs Switzerland) हा सामना सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला. त्या सामन्यात ब्राझीलनं स्वित्झर्लंडवर 1-0 ने विजय मिळवला. पण उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्राझीलचा संघ पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला. आता केवळ सेमीफायनलचे सामने शिल्लक राहिले असून त्यांच वेळापत्रक पुढीलप्रमाणे...
फिफाच्या सेमीफायनल सामन्याचं वेळापत्रक-
सामना | संघ | दिनांक | वेळ |
पहिला सेमीफायनलचा सामना | क्रोएशिया vs अर्जेंटीना | 14 डिसेंबर | रात्री उशिरा 12.30 वाजता |
दुसरा सेमीफायनलचा सामना | मोरक्को vs फ्रान्स | 15 डिसेंबर | रात्री उशिरा 12.30 वाजता |
हे देखील वाचा-