WPL Auction 2025: मुंबईच्या धारावीतील सिमरन गुजरात जायंट्सकडून खेळणार, डब्ल्यूपीएलच्या लिलावात सर्वाधिक बोली
WPL Auction 2025 : विमेन्स प्रीमियर लीग 2025 साठी ऑक्शन पार पडलं. गुजरात जायंट्सकडून सर्वाधिक पैसे खर्च करत मुंबईच्या सिमरन शेखला संघात स्थान दिलं.
Simran Shaikh WPL Auction 2025 मुंबई : गुजरात जायंट्सनं विमेन्स प्रीमियर लीग 2025 च्या ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लावत सिमरन शेखला खरेदी केलं आहे. सिमरन शेखला 1.90 कोटी रुपये खर्चून संघात स्थान देण्यात आलं आहे. मुंबईच्या धारावीतील सिमरन शेख हिला सर्वाधिक रक्कम ऑक्शनमध्ये मिळाली आहे. सिमरन शेख ही मधल्या फळीतील क्रिकेटपटू आहे. तिची बेस प्राइस 30 लाख रुपये होती. मात्र तिला 1 कोटी 90 लाख रुपये मिळाले. सिमरन शेख साठी गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चढाओढ लागली होती.
धारावीतल्या झोपडी वास्तव्य, संघर्षाला मोठं यश
सिमरन शेख आणि तिचं कुटुंब धारावीत वास्तव्यास आहे. असंख्य अडचणींचा सामना करत सिमरन शेखनं मोठी झेप घेतली आहे. 2023 च्या डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात यूपी वॉरिअर्सकडून 9 मॅच खेळली होती. तिला केवळ 29 धावा करता आल्या होत्या. 2024 च्या ऑक्शनमध्ये तिच्यावर कुणीच बोली लावली नव्हती.
सिमरन शेखनं ऑक्शन पाहत असल्याचं म्हटलं. मला इतकी अपेक्षा नव्हती. इतकी बोली लागेल, असं वाटलं नव्हतं, असं सिमरन शेखनं म्हटलं. सिमरन शेखचे वडील जाहिद अली यांनी एएनआयसोबत संवाद साधला. ते म्हणाले सिमरनला लहानपणापूसन क्रिकेटची आवड होती. ती खेळायची तेव्हा लोक तिच्यावर रागवायचे. मात्र, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन तिनं क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. मीडिया रिपोर्टस नुसार सिमरन शेख हिनं दहावीनंतर शिक्षण सोडलं होतं.
डब्ल्यूपीएल 2025 मगा ऑक्शनमध्ये चार जणींना एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करुन संघात स्थान देण्यात आलं. पहिलं नाव सिमरन शेख, दुसरं नाव वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटीन आहे. तिला 1 कोटी 70 लाख रुपे मिळाले. तिची बेस प्राइस 50 लाख होती. 33 वर्षीय डॉटिन हिनं 280 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
मुंबई इंडियन्सनं 16 वर्षांच्या जी कमालिनी हिला 1.6 कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलं. जी कमालिनी मूळची तामिळनाडूची आहे. तिची बेस प्राइस 10 लाख रुपये होती. अंडर 19 टी 20 ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारी ती दुसरी खेळाडू होती. तिनं 311 धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं उत्तराखंडची लेग स्पिनर प्रेमा रावत हिला 1.2 कोटी रुपये खर्च करुन संघात स्थान दिलं.
इतर बातम्या :