वर्ल्ड कप, आशिया चषक पाहा फुकटात, अॅपच्या स्पर्धेत चाहत्यांचा फायदा
मुंबई : पुढील दोन महिने क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा उत्सव आहे. कारण, 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होत आहे.
मुंबई : पुढील दोन महिने क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा उत्सव आहे. कारण, 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होत आहे. त्यानंतर वनडे विश्वचषकाचा माहोल सुरु होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. हाच उत्सव आता चाहत्यांना मोफत पाहायला मिळणार आहे. होय... आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर फुटकात पाहायची संधी चाहत्यांना आहे. ओटीटी अॅप आणि क्रीडा क्षेत्रात रिलायन्स जिओच्या आगमनानंतर चित्र बदलले. अॅपच्या स्पर्धेत मात्र चाहत्यांचा फायदा झालाय. जिओ सिनेमाने आयपीएल 2023 मोफत दाखवले, त्याचा चाहत्यांनी आनंदही घेतला. जिओने दिलेली टक्कर पाहता आणि ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आता डिज्नी प्लस हॉटस्टारही विश्वचषकाचे सामने मोफत दाखवणार आहे.
जिओने विविध क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केलेय. जिओने 2015-16 मध्ये टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर टॅरिफ वॉर सुरु झाले. जिओने सुरुवातीला मोफत कॉल, डेटासह विविध फिचर मोफत सुरुवात केली. त्यामुळे इतर कंपन्यांनाही आपल्या पॉलिसीमध्ये बदल करावा लागला. तशीच स्थिती आता अॅप, ओटीटीवर सुरु होत आहे. जिओ सिनेमाने ओटीटीवर पदार्पण करत सर्वांनाच जोरदार टक्कर दिली. विविध क्रीडा सामने जिओ सिनेमावर प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळू लागले. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पण याचा फटका इतर कंपन्याना बसलाय. जिओ सिनेमाने आयपीएल 2023 स्पर्धा मोफत दाखवली, त्यांना प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. जिओ सिनेमावर लाईव्ह दाखवण्यात आलेली आयपीएल 2023 स्पर्धेला 45 कोटींपेक्षा जास्त युजर्सनी पाहिल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. हा एक विक्रमच झाला. याआधी सर्वजण हॉटस्टार अॅपवरच अवलंबून होते. पण आता जिओने त्यांना कडवी टक्कर दिली आहे. जिओची टक्कर मोडून काढण्यासाठी हॉटस्टारनेही पावले उचलली आहेत. 30 ऑगस्टपासून सुरु होणारा आशिया चषक आणि पाच ऑक्टबरपासून सुरु होणारी विश्वचषक स्पर्धा मोफत दाखवण्याचा निर्णय हॉटस्टारने घेतलाय. अॅपच्या तीव्र स्पर्धेत चाहत्यांचा सध्या तरी फायदा झाल्याचे दिसतेय. विश्नचषक पाहण्यासाठी अनेकजण सबस्क्रिबशन घेतात, पण यंदा सर्वांना मोफत सामने पाहायला मिळणार आहेत.
आशिया चषक कधीपासून ?
आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाचा शुभारंभ होईल. यंदाचा आशिया चषक वनडे फॉर्मेटमध्ये हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहे. सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. अ ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघाचा समावेश आहे. तर ब गटामध्ये बांगलादेश, आफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ असतील. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 13 सामन्यानंतर आशियाचा किंग कोण यावरुन पडदा उठेल.
विश्वचषक कधीपासून ?
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 8 ऑक्टोबरपासून भारत आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.