IND vs SL ASIA CUP 2025 : श्रीलंकेचा शनाका आऊट की नॉट आऊट? सुपर ओव्हरमधला सुपर ड्रामा… पण नियम काय सांगतो?
India vs Sri Lanka Asia Cup 2025 : आशिया चषकात भारतानं विजयी षटकार खेचताना सुपर फोर फेरीत श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. मर्यादित षटकांमध्ये सामना टाय झाला.

Dasun Shanaka OUT and Run OUT In Super Over : आशिया चषकात भारतानं विजयी षटकार खेचताना सुपर फोर फेरीत श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. मर्यादित षटकांमध्ये सामना टाय झाला. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेनं दिलेलं अवघ्या तीन धावांचं आव्हान पहिल्याच चेंडूवर पार करत या स्पर्धेतला सलग सहावा विजय नोंदवला. मात्र सुपर ओव्हरदरम्यान पंचांच्या एका निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली.
सुपर ओव्हर, सुपर ड्रामा
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं सुपर ओव्हरसाठी चेंडू अनुभवी अर्शदीपच्या हाती सोपवला. अर्शदीपनं पहिल्याच चेंडूवर कुशल परेराला माघारी धाडत श्रीलंकेला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मेंडिसनं एका धाव घेतली. तिसरा चेंडू निर्धाव गेला. तर पुढचा चेंडू अर्शदीपनं वाईड टाकला. पण चौथ्या चेंडूवर मैदानात एक नाट्यमय घडामोड घडली.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दसून शनाका यावेळी स्ट्राईकवर होता. अर्शदीपनं टाकलेला चेंडू शनाकाच्या बॅटला चकवा देत थेट विकेटकिपर संजू सॅमसनच्या हातात विसावला. यावेळी शनाका धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राईकर एन्डच्या दिशेनं धावला आणि तिकडे संजू सॅमसननं त्याला यष्टिचित केलं. मात्र याचदरम्यान अर्शदीपनं झेलबादसाठी अपील केलं आणि पंचांनी शनाकाला झेलबाद ठरवलं. यावेळी भारतीय खेळाडू ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असतानाच एक मोठा ड्रामा घडला.
🚨Chaos in the Super Over! 🚨
— Asia Voice 🎤 (@Asianewss) September 26, 2025
Arshdeep to Shanaka — given caught behind, Sri Lanka reviews... but wait! Samson throws down the stumps with a direct-hit too! 🎯
No bat, review successful — but since it was given out initially, the ball’s dead. No run-out, no second chance.… pic.twitter.com/zh6ifYsjjs
शनाका आधी आऊट मग नॉट आऊट
अम्पायरनं झेलबाद दिल्याचं कळताच शनाकानं तातडीनं रिव्ह्यू घेतला. आणि रिव्ह्यूमध्ये बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नसल्याचं स्पष्ट झालं. आता पुढची गोष्ट अशी की पंचांनी शनाकाला नॉट आऊट ठरवलं. पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडू पंचांकडे गेले ते स्टम्पिंगसाठी दाद मागायला. पण नियमानुसार शनाका नॉट आऊट असल्याचं पंचांनी स्पष्ट केलं.
नियम काय सांगतो?
शनाकाला पंचांनी झेलबाद ठरवलं त्याच वेळी तो चेंडू डेड झाला. त्यामुळे त्यानंतर संजू सॅमसननं जरी त्याला यष्टिचित केलं असलं तरीही नियमानुसार तो बाद दिला जाऊ शकत नाही. शनाकानं रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवलं त्यामुळे नंतर तो चेंडू निर्धाव म्हणून मोजला गेला. पण मैदानावर हे सगळं इतक्या वेगानं घडलं की खेळाडूच नव्हे तर सामना पाहणाऱ्या सर्वांनाच या निर्णयाबाबत आश्चर्य वाटलं. पण पुढच्याच चेंडूवर अर्शदीपनं शनाकाची विकेट घेत श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये फक्त दोन धावातच रोखलं. आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर तीन धावा घेत हा सामना संपवला.
रविवारी अंतिम ‘महामुकाबला’
रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात या आशिया चषकातील अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. आजवरच्या आशिया चषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. दरम्यान या स्पर्धेत साखळी फेरीत आणि सुपर फोरमध्ये पाकिस्ताननं भारताकडून सपाटून मार खाल्ला. त्यामुळे अंतिम सामन्यातही भारताचंच पारडं जड मानलं जात आहे.




















