(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harbhajan Singh Vs Mohammad Amir: हरभजन सिंह आणि मोहम्मद आमिर यांच्यात ट्वीटरवर रंगला भलताच सामना, दोघांत नेमके काय घडले?
Harbhajan Singh Vs Mohammad Amir: टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर हरभजन सिंह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना प्रत्युत्तर देण्यात व्यस्त आहे.
Harbhajan Singh Vs Mohammad Amir: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव स्वीकारला. मात्र, या सामन्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही देशातील क्रिकेट चाहते एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. यात भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे. याचदरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर यांच्यात ट्वीटरवर भलताच सामना रंगल्याचे पाहायला मिळाला. मोहम्मद आमिर यांनी एक व्हिडिओ शेअर करून या वादाची सुरुवात केली. आमिरने फैसलाबाद येथे 2006 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. ज्यामध्ये शाहिद आफ्रिदीने हरभजनच्या चार चेंडूत सलग चार षटकार मारले होते. या व्हिडिओला हरभजन सिंहने आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.
मोहम्मद आमिरने ट्विटरवर हरभजन सिंहला टॅग करीत म्हणाला, "मी तुझी गोलंदाजी पाहिली. जेव्हा शाहिद आफ्रिदीने तुझ्या गोलंदाजीवर सलग 4 षटकार ठोकले होते. क्रिकेटमध्ये षटकार लागणे सहाजिक आहे. परंतु, हे कसोटी सामन्यात पाहायला मिळाले. जे थोडे जास्त झाले". हरभजनने आमिरच्या ट्विटला उत्तर देत त्याला 2010 च्या लॉर्ड्स कसोटी सामन्याची आठवण करून दिली.
हरभजन सिंह एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने आमिर 2010 च्या आशिया चषकातील सामन्याची आठवण करून दिली. ज्यात स्वत: हरभजन सिंहने आमिरच्या गोलंदाजीवर षटकार मारला होता. या ट्विटला कॅप्शन देताना हरभजन सिंहने म्हटले आहे की, "आता तूही बोलशील. या षटकाराची लॅन्डिग तुझ्या घराच्या टीव्हीवर तर झाली नव्हती? जाऊदे, होत राहते. तुझे म्हणणे बरोबर आहे की, हा क्रिकेट खेळ आहे". हरभजनच्या ट्विटरवर आमिर म्हणाला की, "सर्वांना नमस्कार, हरभजन सिंहने आपली टीव्ही तोडली. शेवटी हा क्रिकेट खेळ आहे."
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर हरभजन सिंह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना प्रत्युत्तर देण्यात व्यस्त आहे. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारताचा 10 विकेट्स पराभव झाला. विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून पहिल्यांदाच पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने पुढील सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
संबंधित बातम्या-