विराट कोहली-अनुष्का शर्मा झाले अलिबागकर, 8 एकर जमीन घेतली 19 कोटी रुपयांत
Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे.
Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. विराट कोहलीनं अलिबागजवळ झिराड येथे 8 एकर जागा खरेदी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली या आठ एकर जागेवर फार्महाऊस बांधणार आहे. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीनं याने 30 ऑगस्ट रोजी या जागेचे सर्व व्यवहार पूर्ण केले आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी सहा महिन्यापूर्वी झिराड येथील जागेची पाहणी केली होती. आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अलिबागमधील या जागेची खरेदी पूर्ण करण्यास वेळ नव्हता. त्यामुळे विराट कोहलीचा भाऊ विकास याने जागेची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीनं झिराडजवळ घेतलेल्या 8 एकर जागेसाठी 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये मोजले आहेत. विराट कोहलीचा भाऊ विकास याने एक कोटी 15 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली. मंगळवारी विकास कोहलीने निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला. हा सर्व व्यवहार समिरा हॉबिटॅट्स रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून झालाय. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबाग या निसर्गरम्य शहरात अनेकजन फिरण्यासाठी येतात. येथे व्यवसायिक, सिनेकलाकारांसह क्रिकेटपटूही आपलं दुसरं घरं अथवा फार्म हाऊससाठी पसंती देत आहेत. क्रिकेटर, कलाकार, राजकीय नेते, उद्योजक हे अलिबागकर झाले आहेत. यामध्ये आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची भर पडली आहे.
सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रवी शास्त्री, रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ आता विराट कोहलीही अलिबागकर होणार आहे. रवी शास्त्री यांनी दहा वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधले आहे, तर रोहित शर्मा याचे म्हात्रोळी-सारळ परिसरात तीन एकरमधील फार्म हाऊसचे काम चालू आहे. या व्यतिरिक्त हार्दिक पंड्या, यजुवेंद्र चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचल्याचे वृत्त आहे.
विराट कोहली सध्या दुबईमध्ये आशिया चषकामध्ये व्यस्त आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग विरोधात विराट कोहलीनं दमदार फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजवाली. आशिया चषकात विराट कोहली अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.