(Source: Poll of Polls)
Team India : भारतानं एक मॅच रद्द झाली अन् पुढं विजेतेपद मिळवलेलं, आताही तसंच घडलं , भारत 17 वर्षानंतर इतिहास घडवणार?
IND vs CAN: भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच पाऊस आणि मैदान ओलं असल्यानं रद्द करावी लागली आहे. 17 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत भारताची एक मॅच रद्द झाली होती.
फ्लोरिडा : भारत (Team India) आणि कॅनडा यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द करण्यात आली आहे. भारत आणि कॅनडा दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वातील टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचलेली आहे. भारताकडे 7 गुण आहेत. भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच रद्द होणं शुभसंकेत मानला जात आहे. कारण, 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) भारत आणि स्कॉटलँडची मॅच रद्द झाली होती. त्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय क्रिकेट चाहत्यांना 17 वर्षांपूर्वी ज्या प्रमाणं भारतानं विजेतेपद पटकावलं होतं तशीच कामगिरी पुन्हा व्हावी, अशी अपेक्षा आहे.
2007 मध्ये काय घडलं होतं?
भारतीय संघानं 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्त्व महेंद्रसिंग धोनी करत होता. भारताची त्या वर्ल्ड कपमध्ये पहिली मॅच स्कॉटलँड विरुद्ध होणार होती. मात्र, पावसामुळं ती रद्द करावी लागली होती. भारतानं यानंतर दमदार कामगिरी करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्या वेळी भारतानं पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज संघांना पराभूत केलं होतं.
भारतीय संघ आता सुपर 8 मध्ये पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं ग्रुप स्टेजमध्ये आयरलँड, पाकिस्तान आणि अमेरिकेला पराभूत केलं आहे. आता भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाली आहे. भारताचे सुपर 8 मधील दोन सामने निश्चित झाले आहेत. भारताची एक मॅच अफगाणिस्तान विरुद्ध होईल. ही मॅच 20 जूनला होईल. तर, 24 जूनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची मॅच होणार आहे. 22 जूनला भारताविरुद्ध बांगलादेश किंवा नेदरलँडचा संघ असण्याची शक्यता आहे.
भारताचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपणार?
भारतानं दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. भारतानं 2007 मध्ये अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तानला पराभूत केलं होतं. 2011 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये देखील भारतानं अंतिम फेरीच्या लढतीत श्रीलंकेला पराभूत केलं होतं. भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप किंवा वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. भारताला 2023 च्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. रोहित शर्माच्या नेतृ्त्त्वात भारत आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
IND vs CAN : अखेर भारत विरुद्ध कॅनडा मॅच रद्द, रोहितसेना सुपर 8 मध्ये कुणाविरुद्ध लढणार, जाणून घ्या
Shubman Gill : टीम इंडियात नेमकं काय चाललंय? शुभमन गिलनं रोहित शर्माला अनफॉलो केल्यानं खळबळ