Suryakumar Yadav : यशस्वी- गिल डावाची सुरुवात करणार, रिंकू अन् दुबेवर फिनिशरची जबाबदारी, सूर्यकुमार यादवच्या ड्रीम टीममध्ये कुणाला संधी?
Suryakumar Yadav : टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत कुणाला संधी द्यायची याचं आव्हान सूर्यासमोर असेल.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वात टीम इंडिया (Team India) श्रीलंकेला(Sri Lanka) रवाना झाली आहे. 27 जूनपासून तीन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादववर टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील कर्णधार म्हणून निवड केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं 2024 चा टी 20 विश्वचषक जिंकला. यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजानं निवृत्ती जाहीर केली. यामुळं भारतीय क्रिकेट संघाला नव्या कर्णधारपदाची निवड करावी लागली. टी 20 मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. सूर्यकुमार यादवचा प्रयत्न नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडताना पहिल्या मालिकेत विजय मिळवून देण्याचा असेल.
भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात यंग ब्रिगेडनं झिम्बॉब्वे दौऱ्यात विजय मिळवला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ ग्रुप स्टेजमधूनचं टी 20 मालिकेतून बाहेर पडला होता. 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या टी 20 मालिकेत सूर्यकुमार यादव संघात कुणाला संधी देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
यशस्वी - गिलची जोडी डावाची सुरुवात करणार
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 मॅचमध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल भारताच्या डावाची सुरुवात करतील. यानंतर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी रिषभ पंत येईल. चौथ्या स्थानावर कॅप्टन सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी येऊ शकतो. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि शिवम दुबे येतील आणि मॅच फिनिशर म्हणून जबाबदारी पार पाडतील. रवि बिश्नोई आणि अक्षर पटेल हे दोघे फिरकीपटू म्हणून संघात असतील. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे भारताच्या गोलंदाजीची धुरा असेल.
टीम इंडियाची नव्यानं बांधणी
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्त्व करतोय. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याची कारकीर्द देखील सुरु होत आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद कायम ठेवण्याच्या इराद्यानं संघाची बांधणी सुरु करण्यात आलेली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या :
Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाला श्रीलंका दौऱ्यात का संधी नाही? अजित आगरकरनं सगळं समजावून सांगितलं
रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल