श्रेयस अय्यरने केली मुंबईत करोडोंची गुंतवणूक; आईसोबत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत किती?
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आणि त्याची आई रोहिनी यांनी मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटची खरेदी केली आहे.
Shreyas Iyer: भारताचा क्रिकेटर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि त्याची आई रोहिणी अय्यरने मुंबईमध्ये आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. याची किंमत 2.90 कोटी रूपये सांगितली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे अपार्टमेंट मुंबईच्या वरळी भागात आहे. 19 सप्टेंबरला प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन झाले होते.
मिळालेल्या माहितीनूसार श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) हे नवे अपार्टमेंट वरळीच्या आदर्श नगरमध्ये त्रिवेणी इंडस्ट्रीयल सीएचएसएलच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. 525 फूट एरिया आहे. ही प्रॉपर्टी त्यांनी 55,238 रूपये प्रति चौरस फूट दराने खरेदी केली आहे. यासाठी 17.40 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आणि त्यानंतर 30 हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणून देण्यात आले.
श्रेयस अय्यरचे लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही घर-
श्रेयस अय्यरने रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही त्यांनी घर विकत घेतले आहे. त्याने सप्टेंबर 2020 मध्ये द वर्ल्ड टॉवर्सच्या 48 व्या मजल्यावर 2,380 स्क्वेअर फुटांचे घर विकत घेतले. या अपार्टमेंटमध्ये 3 कार पार्किंगची सुविधाही उपलब्ध आहे. जुलै 2024 मध्ये, अय्यर मुंबईत व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला.
मुंबई शहर-उपनगरातील किंमती गगनाला भिडल्या-
मुंबई मुख्य शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरांच्या वेगवेगळ्या किंमती पाहायला मिळत आहेत. मुंबई मुख्य शहर आणि शहरातील मध्यवर्ती भागात साधारण 650 ते 700 चौरस फुट एवढ्या घराचे दर दोन ते अडीच कोटींपेक्षा जास्त आहेत. आणि पश्चिम उपनगरांत 2 बीएचके घराची किंमत एक ते दीड किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. पण पूर्व उपनगरांमध्ये मात्र घरांच्या किंमती कमी आहेत. पूर्व उपनगरांमध्ये घरांच्या किंमती 60 ते 75 लाख रुपयांपर्यंत आहेत.
मुंबईतील मालमत्तेच्या किंमतीत 13 टक्क्यांनी वाढल्या-
जगभर मालमत्तेच्या किमती गगनाला भिडत आहेत. कोरोनानंतर प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी आली आहे. दुसरीकडे, आता लोक परवडणाऱ्या घरांऐवजी मोठी घरे आणि प्राइम लोकेशनला महत्त्व देत आहेत. दरम्यान, एका निर्देशांकानुसार फिलीपिन्सची राजधानी मनिला हे प्राइम लोकेशनमधील मालमत्तेच्या बाबतीत जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. नाइट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्सनुसार, मनिलामधील मालमत्तेच्या किमती वर्षानुवर्षे 26 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हा आकडा जूनमध्ये संपलेल्या तिमाहीचा आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई सर्वाधिक महागड्या मालमत्तेच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील मालमत्तेच्या किंमतीत 13 टक्के वाढ झाली आहे. मुकेश अंबानी, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज व्यक्ती मुंबईत राहतात. मुंबईतील वांद्रे पश्चिम, वरळी, मलबार हिल, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, बोरिवली, गोरेगाव पश्चिममध्ये सर्वात महागडी घरं उपलब्ध आहेत.