बाजारातून 10, 20,50 रुपयांच्या नोटा गायब?, लोकांची अडचण होतेय, लवकर मार्ग काढा, काँग्रेस खासदाराचं थेट अर्थमंत्र्यांना पत्र
Currency Notes : बाजारात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा कमी असल्यानं गरिबांना त्रास होत असल्याबाबत पत्र काँग्रेस खासदारानं पत्र लिहिलं आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ऑनलाईन व्यवहार वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. विविध पेमेंटस अॅपद्वारे यूपीआय प्रणालीचा वापर केला जात असल्यानं बाजारात नोटांचा वापर कमी झाला आहे. लोकसभेतील काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं आहे. 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा कमी झाल्यानं ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं टागोर यांनी म्हटलं आहे.
मणिकम टागोर यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून यूपीआय आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नोटा छापणं बंद केल्याची माहिती मिळाल्याचं म्हटलं. डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देणं समझू शकतो मात्र यामुळं लोकांवर परिणाम होत आहे. जे लोक डिजीटल पेमेंटचा वापर करत नाहीत त्यांना त्रास होत आहे. ग्रामीण भारतातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं देखील काँग्रेसच्या खासदारांनी म्हटलं.
10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध होत नसल्यानं चलन प्राप्त करण्याच्या मुलभूत अधिकाराचं उल्लंघन होत आहे. छोट्या नोटा कमी झाल्यानं याचा परिणाम लहान व्यावसायिकांवर झाला आहे. रोजंदारी करणारे मजूर, रेल्वेमधील विक्रेते हे पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आरबीआयला नोटा छापण्याचे आदेश द्यावेत, असं मणिकम टागोर यांनी म्हटलं. गावांमध्ये डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यावर भर द्यावा, असंही ते म्हणाले.
देशातील चार ठिकाणी नोटा छापल्या जातात. आरबीआयच्या आदेशानं डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंटकडून नोटा छापल्या जातात. चलनी नोटांच्या छापखान्यांपैकी दोन कारखान्यांची मालकी भारत सरकारकडे तर दोन छापखान्यांची मालकी आरबीआयकडे आहे.
इतर बातम्या :