(Source: ECI/ABP News/ABP Majha)
USA vs IRE : बाबरला ज्याची भीती होती तेच घडलं, आयरलँड विरुद्धची मॅच रद्द होताच अमेरिका सुपर 8 मध्ये, पाकिस्तान स्पर्धेबाहेर
USA vs IRE : अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच पावसानं रद्द झाल्यानं पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा संपल्या आहेत. पावसानं पाकिस्तानचा खेळ बिघडवल्यानं त्यांना स्पर्धेबाहेर जावं लागंल.
फ्लोरिडा : टी20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2024) मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचं (Pakistan Ruled Out of World Cup) स्पर्धेतील आव्हान संपलं आहे. अमेरिकेचा संघ (USA Enterd In Super 8)आयरलँड विरुद्ध एकही बॉल न खेळता सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे. अमेरिका विरुद्ध आयरलँड यांच्यातील मॅच खराब वातावरणामुळं आणि पावसामुळं रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आल्यानं पाकिस्तानची सुपर 8 मधील प्रवेशाची अखेरची आशा देखील संपली आहे. बाबर आझमच्या नेतृत्त्वातील पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अ गटातून भारत आणि अमेरिका सुपर 8 मध्ये दाखल झालं आहे. आतापर्यंत सुपर 8 मध्ये सहा संघ दाखल झाले आहेत.
पाकिस्तान स्पर्धेबाहेर
फ्लोरिडातील पाऊस आणि पूरस्थितीचा फटका तिथं होणाऱ्या सामन्यांना बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज देखील पाऊस सुरु असल्यानं अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच वेळेवर सुरु होऊ शकली नाही. अखेर पंचांनी आणि मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी मैदानाची पाहणी केली आणि वातावरणाचा आढावा घेतला. पावसाची शक्यता पुन्हा निर्माण झाल्यानं अखेर मॅच रद्द करत दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आले. यामुळं अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला फटका बसला. अमेरिकेच्या नावावर आता 5 गुण जमा झाला आहेत. पाकिस्तानची एक मॅच शिल्लक राहिल्यानं त्यांना या गुणांची बरोबरी करणं अशक्य झाल्यानं त्यांचा यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील प्रवास संपला आहे.
The fate of Group A is 🔒
— ICC (@ICC) June 14, 2024
USA advance to the Super Eight of the #T20WorldCup 2024 as they share a point each with Ireland 👏#USAvIRE pic.twitter.com/NvlDPT0T0Y
पाकिस्तानची आयरलँड विरुद्ध 16 जूनला मॅच होणार आहे. मात्र, या मॅचमध्ये पाकिस्ताननं विजय मिळवला तरीते अमेरिकेची बरोबरी करु शकणार नाहीत. परिणामी आजचं पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.
बाबर आझमच्या संघाला निसटते पराभव महागात पडले
बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला पहिल्या मॅचमध्ये अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताविरुद्ध त्यांनी हातात आलेली मॅच गमावली. भारताविरुद्ध त्यांनी 6 धावांनी पराभव स्वीकारला. याशिवाय पाकिस्ताननं कॅनडाला पराभूत केल्यानं त्यांच्या नावावर दोन गुण जमा झाले होते. मात्र, अमेरिका विरुद्ध आयरलँड मॅच रद्द झाल्यानं पाकिस्तानच्या सुपर 8 मधील प्रवेशाच्या आशा देखील संपल्या आहेत. आशिया खंडातील श्रीलंका आणि पाकिस्तान हे दिग्गज संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत. दुसरीकडे अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. तर, बांगलादेश देखील सुपर 8 च्या शर्यतीत आहे. भारतानं अगोदरचं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
संबंधित बातम्या :
T 20 World Cup 2024 :सुपर 8 मध्ये भारताविरुद्ध कोण भिडणार? दोन संघ ठरले, तिसऱ्याबाबत सस्पेन्स कायम