T20 World Cup 2024 SA vs BAN: आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात; पंचांनी चौकार नाकारला अन् 4 धावांनीच पराभव झाला!
T20 World Cup 2024 SA vs BAN: बांगलादेशच्या पराभवात आयसीसीच्या नियमांचा मोठा वाटा असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.
T20 World Cup 2024 SA vs BAN: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेत काल दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश (South Africa vs Bangladesh) यांच्यात सामना खेळवण्यात आला. यासामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या विकेटवर प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने 113 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 7 गडी गमावून 109 धावाच करू शकला. मात्र, सामना संपताच वादालाही सुरुवात झाली. बांगलादेशच्या पराभवात आयसीसीच्या नियमांचा मोठा वाटा असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.
आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशने हा सामना गमावला. हा नियम नसता तर सामना टाय झाला असता आणि नंतर सुपर ओव्हर खेळावी लागली असती. खरंतर, 17व्या षटकाचा दुसरा चेंडू महमुदुल्लाहच्या पॅडला लागल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेला. दक्षिण आफ्रिकेने अपील केले आणि अंपायरने आऊट दिला. महमुदुल्लाहने डीआरएस घेतला आणि तो नाबाद राहिला. पण त्यानंतरही त्याला ही चौकार दिला नाही.
An umpire's decision which prevented the four for Bangladesh due to LBW.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 10, 2024
- Bangladesh lost the match by 4 runs! pic.twitter.com/6tvVPyK2LB
नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार अंपायरने बॅट्समनला आऊट दिल्यास डेड बॉलचा निर्णय दिला जातो. डीआरएसमध्ये फलंदाज नाबाद राहिला, तरी त्याला त्या चेंडूवर केलेल्या धावा मिळत नाहीत. आयसीसीच्या क्रिकेट नियमांचा 23.1(a)(iii) कायदा सांगतो की, जर रिव्ह्यू मागितल्यानंतर आऊटचा निर्णय नॉटआऊटमध्ये बदलला गेला, तर मूळ निर्णयाच्या वेळी चेंडू डेड मानला जाईल.' हा नियम हटविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. यावेळी कॉमेंट्री दरम्यान आकाश चोप्रा देखील या नियमाविरोधात बोलला आहे. बांगलादेशच्या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जाफरनेही या नियमावर प्रश्न उपस्थित केले होते.
सामना कसा होता?
बांगलादेशसमोर 114 धावांचे लक्ष्य होते, मात्र दुसऱ्याच षटकात 9 धावा करणाऱ्या तनजीद हसनच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेकडून भेदक गोलंदाजी होती, त्यामुळे पॉवरप्ले ओव्हर्समध्ये बांगलादेशला केवळ 29 धावा करता आल्या. पण लिटन दासही 7व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 9 धावा काढून बाद झाला. शाकिब हसनने 3 तर कर्णधार नझमुल हुसेन शांतोने 14 धावा केल्या. अशाप्रकारे संघाने 50 धावात 4 विकेट्स गमावल्या. बांगलादेशने 10 षटकांत 4 गडी गमावून 50 धावा केल्या होत्या. तौहीदने आणि महमुदुल्लाह यांच्यात चांगली भागीदारी झाली आणि त्यांनी मिळून संघाची धावसंख्या 15 षटकांत 83 धावांपर्यंत नेली. 17व्या षटकात महमुदुल्लाहविरुद्ध पायचीतचे अपील करण्यात आले होते, परंतु डीआरएसनंतर त्याला नाबाद घोषित करण्यात आले. सामना बहुतांशी बांगलादेशच्या ताब्यात होता, मात्र 18व्या षटकात रबाडाने तौहीदची विकेट घेत 37 धावांवर त्याला माघारी पाठवले. शेवटच्या 2 षटकात बांगलादेशला विजयासाठी 18 धावांची गरज होती. बांगलादेशला अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या 4 चेंडूत 7 धावांची गरज असताना एक चेंडू निर्धाव गेला. मग 3 चेंडूत 7 धावा हव्या होत्या. एक धाव काढल्याने बांगलादेशला 2 चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. पुढचा चेंडू निर्धाव गेल्याने अखेरच्या चेंडूवर बांगलादेशला एका षटकाराची गरज होती. मात्र, सामन्यातील शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् दक्षिण आफ्रिकेने चार धावांनी विजय मिळवला.