भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, कुलदीप बुमराहचा भेदक मारा, बांगलादेशचा 50 धावांनी धुव्वा!
T20 World Cup 2024 IND vs BAN : भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालेय. भारताच्या नावावर चार गुण आहेत, त्याशिवाय नेटरनरेटही जबरदस्त आहे.
T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: बांगलादेशचा 50 धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियाने उपांत्य फेरीचं तिकिट निश्चित केलेय. लागोपाठ दोन पराभवानंतर बांगलादेशचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. बांगालदेशला आधी ऑस्ट्रेलियाने आणि आता भारताने हरवले, त्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. सुपर 8 मध्ये भारताने लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवलाय. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अखेरचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे.
सांघिक खेळाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, विराट कोहली, जसप्रती बुमराह आणि शिवम दुबे यांनी शानदार खेळी केली. हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळी करत विजयात सिंहाचा वाटा उचलाल. हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हार्दिक पांड्याने फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले, त्यानंतर गोलंदाजीवेळी महत्वाची विकेट घेतली.
जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशचे फलंदाज अडकले. जसप्रीत बुमराहने 4 षटकात फक्त 13 धावा खर्च करत दोन फलंदाजांना माघारी धाडले. तर कुलदीप यादवने चार षटकात 19 धावा खर्च करत तीन फलंदाजांची शिकार केली. हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली. तर अर्शदीप सिंह यानं दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
भारताने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ फक्त 146 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. बांगलादेशकडून कर्णधार नजिमुल शांतो याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. कर्णधार शांतोनं एकाकी झुंज दिली. त्याने 32 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 3 षटकार आणि एक चौकार ठोकले. तंदीद हसन याने 31 चेंडूत 29 धावांची संथ खेळी केली. लिटन दास 13, तोहीत ह्दर्य 4, शाकीब अल हसन 22, महमुदल्लाह 13, जाकेर अली 1 यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस राशीद हुसेन याने विस्फोटक फलंदाजी केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. राशीद हुसेन याने 10 चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 24 धावांचा पाऊस पाडला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित -
भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालेय. भारताच्या नावावर चार गुण आहेत, त्याशिवाय नेटरनरेटही जबरदस्त आहे. अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरोधात अतिशय मोठ्या फराकाने विजय मिळवावा लागेल. तसेच ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव करावा लागेल, तेव्हाच अफगाणिस्तान उपांत्य फेरीत जाऊ शकतं. सध्या तशी शक्यता दिसत नाही. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रविवारी सकाळी होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान खडतर होऊ शकतं.