Suryakumar Yadav India vs Australia: कांगारुंच्या 'गोल्डन डक'चा शिकार झाला सूर्या; T20 चा नंबर 1 फलंदाज वनडेमध्ये मात्र फेल
Suryakumar Yadav India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबईतील एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. पण ती सांभाळण्यात तो अयशस्वी ठरला.
Suryakumar Yadav India vs Australia: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात आला. या सामन्यात दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) जागी मधल्या फळीची जबाबदारी टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खांद्यावर सोपवण्यात आली होती. पण ही जबाबदारी पार पाडण्यात सूर्यकुमार पूर्णपणे अपयशी ठरला.
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवीय मालिकेतून बाहेर आहे. अशा स्थितीत सूर्याला मुंबई वनडेत संधी देण्यात आली. या सामन्यात टीम इंडियाला 189 धावांचं माफक लक्ष्य मिळालं होतं. मात्र एवढुशा धावसंख्येचं लक्ष्य गाठतानाही टीम इंडियाची अवस्था बिकट झाली. टीम इंडियाने अवघ्या 39 धावांत टॉप-4 विकेट गमावल्या होत्या.
सूर्याकडून चाहत्यांचा अपेक्षा भंग
टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरताच अवघ्या 14 धावांवरच दोन विकेट्स गेल्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार मैदानात आला. सूर्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून अपेक्षा होती. सूर्या आपल्या धमाकेदार खेळीने कांगारुंना पाणी पाजेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण सूर्याची जादू काही कांगारुंसमोर चालली नाही. सूर्यकुमार कांगारुंच्या जाळ्यात अडकला.
आयसीसी टी-20 क्रमवारीत नंबर-1 असलेला टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव क्रीजवर आला आणि पहिल्याच चेंडूवर एलबीडब्लू आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार गोल्डन डकवर आऊट झाला आणि चाहत्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. सूर्याचा टी-20 मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड सर्वोत्कृष्ट आहे. पण एकदिवसीय सामन्यात मात्र सूर्याची जादू चालली नाही.
सूर्यकुमारचे आतापर्यंतचे रेकॉर्ड
- 1 टेस्ट मॅच : 8 रन : सरासरी 8 चा रनरेट
- 21 वनडे मॅच : 433 रन : सरासरी 27.06 चा रनरेट
- 48 टी20 इंटरनेशनल मॅच : 1675 रन : सरासरी 46.53 चा रनरेट
10 एकदिवसीय डावांत 13.66 च्या सरासरीने 123 धावा
सूर्यकुमारला त्याच्या शेवटच्या 10 एकदिवसीय डावात 6 वेळा दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही. सूर्या मैदानात आला आणि त्याने एकही रन न काढता तो माघारी परतला असं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं आहे. दरम्यान, टी-20मध्ये सूर्या तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. सूर्याने गेल्या 10 एकदिवसीय डावांत 13.66 च्या सरासरीने 123 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय सामन्यात इतर वेळी श्रेयस अय्यर टीम इंडियाची मधल्या फळीतील कमान सांभाळतो. पण अय्यरला दुखापती झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून तो सध्या बाहेर आहे. त्यामुळे टीम इंडियाला अय्यरच्या जागी पर्याय शोधणं भाग होतं. अशातच सूर्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सूर्या वनडेमध्ये फारशी जादू दाखवू शकलेला नाही. तसं पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रजत पाटीदारचाही समावेश संघात आहे. रजत पाटीदारही जबरदस्त फॉर्मात आहे. पाटीदारकडे दुर्लक्ष करत सूर्याला संधी दिली. पण आता पुढच्या एकदिवसीय सामन्यात सूर्याची जागा पाटीदार घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.