IND vs SA 3rd T20: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज काटे की टक्कर, पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर सर्वांचं लक्ष!
IND vs SA 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज विशाखापट्टणम येथे तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे.
IND vs SA 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज विशाखापट्टणम येथे तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं पहिले दोन सामने गमावल्यामुळं आजचा सामना भारतासाठी 'करो या मरो' चा असणार आहे. या मालिकेत भारत 2-0 नं पिछाडीवर आहे. या मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकायचा आहे. तर, या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन, डेव्हिड मिलर आणि टेंबा बावुमा यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष राहणार आहे.
ईशान किशन
टीम इंडियाचा सलामीवीर इशान किशननं या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्या दोन सामन्यात 55.00 च्या सरासरीनं आणि 159.42 च्या स्ट्राईक रेटनं 110 धावा केल्या आहेत. ज्यात 13 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. आजच्या सामन्यातही ईशानकडून अशाच कामगिरीची अपेक्षा ठेवली जात आहे.
ऋषभ पंत
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची धुरा संभाळत असलेल्या ऋषभ पंतला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आली नाही. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्यानं 17.00 च्या सरासरीनं 34 धावा केल्या आहेत. तो आतापर्यंत मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात त्याच्याकडून मॅचविनिंग इनिंगची अपेक्षा असेल.
हार्दिक पांड्या
आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत त्यानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. यामुळं आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
डेव्हिड मिलर
दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड मिलर सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मालिकेतही त्यानं आयपीएलचा फॉर्म कायम ठेवला आहे. मिलरनं पहिल्या दोन सामन्यात 84 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 182.61 इतका होता. आजच्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी धावसंख्या करून संघाला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
टेम्बा बावुमा
आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं या मालिकेत आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळलेली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो सावधपणे फलंदाजी करताना दिसला. त्यानं या मालिकेत आतापर्यंत 22.50 च्या सरासरीनं आणि 118.42 च्या स्ट्राईक रेटनं 45 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत आज तो आपल्या संघासाठी मोठी खेळी करून मालिका जिंकण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल.
हे देखील वाचा-