Rishabh Pant : ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Sourav Ganguly : माजी कर्णधार सौरव गांगुली याने ऋषभ पंतबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. पंत कधीपर्यंत मैदानात परतणार याबाबतही त्यानं वक्तव्य केलं आहे.
Rishabh Pant Health Update : भारतीय संघाचा (Team India) स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला. ज्यानंतर तो पुन्हा फिट होऊन मैदानावर कधी परतेल, याची वाट सर्वजण पाहत आहेत. अशात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने ऋषभ पंतच्या रिकव्हरीबाबत मोठी अपडेट दिली आहे. गांगुली हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा क्रिकेट संचालक म्हणून सध्या काम पाहत असून त्याने पंत कधी पुनरागमन करेल याबाबत अपडेट दिली आहे.
ऋषभ पंत आयपीएल 2023 चा भाग असणार नाही, हे आधीच स्पष्ट झालं आहे, पण तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर किती काळानंतर दिसणार? याचं उत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक सौरव गांगुली म्हणाला, माझ्या मते ऋषभ पंतला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 2 वर्ष लागतील. त्यामुळे गांगुलीच्या मते पंत तब्बल 2 वर्षांनंतर मैदानात परतण्याची शक्यता आहे.
ऋषभ पंतच्या रिकव्हरीवर सौरव गांगुली काय म्हणाला?
सौरव गांगुली म्हणाला की, मी ऋषभ पंतशी अनेकदा बोललो आहे. ऋषभ पंतसाठी ही वेळ सोपी नाही, आव्हानात्मक आहे. शस्त्रक्रियेनंतर तो सध्या बरा होत आहे. पंत जवळपास एक वर्ष किंवा दोन वर्षांनीच मैदानात परतेल असं मला वाटतं. पुढे बोलताना ऋषभ पंत लवकरच भारतासाठी मैदानात दिसेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली.
रुरकीला जाताना झाला होता अपघात
ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयने मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती. याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटात खोली आहे. आता लिगामेंट ऑपरेशनमुळे पंत 6 ते 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेशिवाय तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर राहू शकतो. जर त्याने तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ घेतला तर पंत 2023 च्या विश्वचषकातूनही बाहेर राहू शकतो.
हे देखील वाचा-