Shubman Gill ODI Record : शुभमन गिल तुफान फॉर्मात, सलग दुसरं एकदिवसीय शतक ठोकत खास रेकॉर्डही केला नावावर
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज शुभमन गिल याने 87 चेंडूत दमदार शतक ठोकत एक खास विक्रम नावावर केला आहे.
Shubhman Gill Century : भारतीय संघाचा स्टार युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याने आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमनने शानदार शतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये शतक झळकावल्यानं त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमनने 87 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे या शतकासोबत त्याने एक खास रेकॉर्डही नावावर केला आहे.
जलदगतीने 1000 वनडे धावा केल्या पूर्ण
शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कारकिर्दीतील 1000 धावा पूर्ण केल्या. त्याने 19 व्या डावात ही विशेष कामगिरी केली आहे. ज्यामुळे शुभमन हा सर्वात जलदगतीने वनडेमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा तर भारतीय पहिला खेळाडू ठरला आहे. इमामुल हक याच्यासह शुभमन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली आणि शिखर धवन यांनी 24 डावात 1000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. पण या दोघांना मागे टाकत शुभमनने 19 डावांत ही कमाल केली आहे.
View this post on Instagram
सलग दुसऱ्या वनडेत ठोकले शतक
शुभमनने न्यूझीलंडविरुद्ध शतक करत सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलं आहे. याआधी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात 116 धावांची इनिंग खेळली होती. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यातही त्याने शतक झळकावलं आहे. अशा स्थितीत शुभमनचे सलग दुसऱ्या वनडेतील हे दुसरे शतक आहे. न्यूझीलंडविरुद्ध शुभमनने 19 व्या डावात वनडेतील तिसरं शतक झळकावले आहे.
हे देखील वाचा-