Ind A vs Aus A : भारताचे शेर ऑस्ट्रेलियात झाले ढेर! अवघ्या 107 धावा करून संघ कोसळला, कर्णधार ऋतुराज शून्यावर तर किशन...
सध्या भारतात दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत आहे, पण देशापासून दूर भारत अ संघ ऑस्ट्रेलियात खेळत आहे.
Australia A vs India A 1st unofficial Test : सध्या भारतात दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत आहे, पण देशापासून दूर भारत अ संघ ऑस्ट्रेलियात खेळत आहे. दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून (31 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यात मॅके येथे खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांची अवस्था खुपच वाईट होती आणि संघ संपूर्ण दोन सत्रही ते टिकू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव 47.4 षटकांत अवघ्या 107 धावांत आटोपला. अशाप्रकारे टीम इंडियाचा डाव मैदानावर पूर्ण दोन सत्रेही टिकू शकला नाही.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड गोल्डन डकवर बाद झाला. त्याचा जोडीदार अभिमन्यू ईश्वरनही फार काळ टिकू शकला नाही आणि केवळ 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी काही काळ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी अनुक्रमे 21 आणि 36 धावा केल्या. तर बाबा इंद्रजीत केवळ 9 धावा आणि इशान किशन केवळ 4 धावांचे योगदान देऊ शकला.
अष्टपैलू नितीश रेड्डीही काही अप्रतिम करू शकला नाही आणि त्याचे खातेही उघडले नाही. भारतीय डाव फक्त 100 च्या आत मर्यादित राहील असे वाटत होते पण शेवटी नवदीप सैनीने 43 चेंडूत 23 धावा करत संघाची धावसंख्या 107 पर्यंत नेली. त्याची विकेट पडताच भारताचा डाव संपला. ऑस्ट्रेलियासाठी ब्रेंडन डॉगेटने 6 फलंदाजांना आपले शिकार बनवले.
टीम इंडिया व्यवस्थापन भारत अ च्या अनौपचारिक सामन्यांवर देखील लक्ष ठेवणार आहे, कारण अभिमन्यू ईश्वरन आणि नितीश रेड्डी यांची देखील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. अभिमन्यूला बॅकअप सलामीवीर म्हणून ठेवण्यात आले आहे, तर नितीशला वेगवान अष्टपैलू म्हणून संधी मिळाली आहे. या दोघांकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. अशा स्थितीत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी या दोन चार दिवसीय सामन्यांमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेण्याची चांगली संधी आहे.
हे ही वाचा -