Rishabh Pant : अखेर 527 दिवसांनंतर तो क्षण येणार, रिषभ पंत म्हणाला, ती एक गोष्ट खूप मिस करायचो...
Rishabh Pant : टीम इंडियाचा युवा खेळाडू रिषभ पंतनं बीसीसीआय टीव्हीसोबत बोलताना टी-20 वर्ल्ड कपबाबत भावना व्यक्त केल्या.
न्यूयॉर्क : भारतीय क्रिकट संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं होतं. भारतातील क्रिकेटचे कोट्यवधी चाहते त्या क्षणाची वाट पाहत आहेत. कार अपघातानंतर रिषभ पंतनं देखील पुनरागमन केलं आहे. रिषभ पंत भारतीय संघासोबत अमेरिकेत दाखल झाला आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतची टीम इंडियात टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली होती. बीसीसीआय टीव्हीसोबत बोलताना रिषभ पंतनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाची जर्सी मिस करायचो : रिषभ पंत
बीसीसीआय टीव्हीनं रिषभ पंतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओच्या सुरुवातीला रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादवचा संवाद दाखवण्यात आला आहे. यावेळी ते नॅशनल क्रिकेट अकादमीमधील आठवणींवर चर्चा करतात. यानंतर रिषभ पंतनं त्याच्या भावना व्यक्त केल्या. रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव दोघेही दुखापतीमुळं नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत होते.
भारताच्या टीमच्या जर्सीसह मैदानात उतरणं ही एक वेगळी भावना असते.ही गोष्ट मी मिस करत होतो. टीममधील सहकाऱ्यांना भेटणं, गंमती करणं चर्चा करणं या गोष्टी आनंद देणाऱ्या असतात. या गोष्टी मिस करत होतो. क्रिकेट जगभरात बदलत आहे. आता अमेरिकेसारख्या क्रिकेटला प्रोत्साहन मिळतंय. नव्यानं पीच तयार केली जात आहेत. आता पुढचा प्रवास चांगला होईल, अशी अपेक्षा असल्याचं रिषभ पंतनं म्हटलं.
रिषभ पंत 527 दिवसानंतर टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार
रिषभ पंतचा कार अपघात झाला होता. त्या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला होता. रिषभ पंतनं उपचार आणि मेहनतीच्या जोरावर कमबॅक केलं. दिल्ली कॅपिटल्सचं आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर रिषभ पंतसाठी टीम इंडियाची दारं उघडली. आता रिषभ पंत आयरलँड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे.
टीम इंडियाच्या मॅचेस कधी?
भारताची टी-20 वर्ल्ड कप मधील पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक विरोधक आमने सामने येणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये हायव्होल्टेज लढत 9 जूनला होणार आहे. यानंतर भारत आणि अमेरिका 12 जूनला आमने सामने येईल. तर, 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात मॅच होईल.
संबंधित बातम्या :