Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
Rishabh Pant : रिषभ पंतनं अपघातानंतर दमदार पुनरागमन केलं आहे. अपघातानंतर भारताकडून तो पहिल्यांदा कसोटी मालिका खेळत आहे.
चेन्नई : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात पहिली कसोटी चेन्नईत सुरु आहे. भारतानं या सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. बांगलादेश विरुद्ध भारताच्या युवा फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी केली. रिषभ पंतनं दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला. त्यानं 13 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 128 बॉलमध्ये 109 धावा केल्या आहेत. रिषभ पंतचं हे कसोटी क्रिकेटमधील सहावं शतक ठरलं. रिषभनं या कामगिरीच्या जोरावर महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
रिषभ पंतनं कसोटीमध्ये दमदार कमबॅक केलं आहे. रिषभ पंतसाठी चेन्नई कसोटी महत्त्वाची आहे. दिल्लीहून डेहराडूनला जाताना रिषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून जवळपास 634 दिवसानंतर भारताकडून कसोटी खेळण्यासाठी रिषभ चेन्नईच्या मैदानावर उतरला. बांगलादेश विरूद्धच्या कसोटीत दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. रिषभ पंतला शतकी खेळीनंतर मेहदी हसन मिराज यानं बाद केलं.
रिषभ पंतनं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनीनं भारतासाठी 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यानं सहा शतकं केली होती. मात्र, रिषभ पंतनं त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची कामगिरी केवळ 34 कसोटी सामन्यामध्ये केली आहे.
रिषभ पंतच्या कसोटी करिअरचा विचार केला असता त्यानं 34 कसोटी खेळल्या आहेत. त्यानं 6 शतकं केली असून 11 अर्धशतकं केली आहेत. रिषभ पंतनं 59 षटकार मारले असून 263 चौकार देखील मारले आहेत.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं भारताकडून 90 कसोटी सामने खेळले आहेत. धोनीच्या नावावर सहा शतकं आणि 33 अर्धशतकांची नोंद आहे. याशिवाय महेंद्रसिंह धोनीच्या नावावर द्विशतक देखील आहे.
चेन्नई कसोटीवर भारताचं वर्चस्व
भारतानं चेन्नई कसोटीत बांगलादेशवर पूर्ण वर्चस्व मिळवलं आहे. भारतानं पहिल्या डावात 376 धावा केल्या. तर, पाहुण्या बांगलादेश संघाला 149 धावांवर बाद केलं. यानंतर दुसऱ्या डावात भारतानं 4 बाद 287 धावांवर डाव घोषित केला. शुभमन गिल, रिषभ पंत या दोघांनी शतक पूर्ण केलं. भारतानं पहिल्या कसोटीत बांगलादेशवर वर्चस्व मिळवलं आहे. दुसऱ्या डावात बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशनं तिसऱ्य दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 158 धावा केल्या आहेत. बांगलादेशच्या नजमूल शांटो यानं अर्धशतक केलं. चौथ्या दिवशी भारताचे गोलंदाज बांगलादेशच्या राहिलेल्या 6 विकेट मिळवत विजय मिळवून देतात का पाहावं लागेल. भारताच्या विजयासाठी आता गोलंदाजांना दमदार कामगिरीकरावी लागेल.
इतर बातम्या :