(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2023 : पाकिस्तानचा सुपर 4 मध्ये प्रवेश, भारतासाठी 'करो या मरो'ची स्थिती
India vs Pakistan Match Highlights : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला.
India vs Pakistan Match Highlights : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानची फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच मैदानात पावसाने खेळ सुरु केला. दोन तास मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला.
पाकिस्तानची सुपर 4 मध्ये एन्ट्री -
पाकिस्तानने तीन गुणांसह सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळचा दारुण पराभव केला होता. पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी विराट पराभव केला होता. त्या सामन्यात पाकिस्तानला दोन गुण मिळाले होते. भारताविरोधात पाकिस्तान संघाने एका गुणांची कमाई केली. आशा पद्धतीने पाकिस्तान संघाने तीन गुणांसह सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला. सुपर 4 मध्ये पोहचणारा पाकिस्तान पहिला संघ ठरलाय.
भारतासाठी आता करो या मरोची लढाई -
पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.
पाकिस्तानच्या तिकडीचा भेदक मारा, इशान-हार्दिकची झुंज -
पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. शहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी भारताच्या दहा फलंदाजांना तंबूत धाडले. भारतीय संघाने 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. इशान किशन याने 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 90 तर इशान किशन याने 81 चेंडूचा सामना केला. हार्दिक आणि इशान यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावसंख्या ओलांडता आली नाही. जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या केली.