PAK vs WI : पाक-विंडीज मालिकेत चौकार-षटकार नव्हे कोरोनाचा हाहा:कार, तब्बल 8 जण पॉझिटिव्ह
WI Tour of Pakistan : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या तीन सामन्याची टी-20 मालिका सुरु आहे. वेस्ट इंडिज संघातील तीन खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
WI Tour of Pakistan : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान संघाने मालिका आधीच जिंकली आहे. आज, मालिकेतील अखेरचा टी-20 सामना होणार आहे. मात्र, या सामन्यावर कोरोना महामारीचं सावट उभं राहिलं होतं. वेस्ट इंडिज संघातील तीन खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अखेरच्या टी-20 सामन्यावर आणि त्यानंतर होणाऱ्या वन-डे सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण योग्य त्या उपाययोजना करत सामना अखेर खेळवण्यात आला आहे.
सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिज क्रिकेट (WI Cricket Board) बोर्ड पाकिस्तान इतर दौरा रद्द करण्याची शक्यता आहे. अखेरचा टी-20 सामना खेळून विंडिजचा संघ माघारी परतू शकतो, असेही काही प्रसार माध्यमांनी सांगितलेय. बुधवारी वेस्ट इंडिज संघातील तीन खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. याआधीही वेस्ट इंडिज संघातील तीन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यष्टीरक्षक होप, फिरकीपटू अकील हुसैन आणि अष्टपैलू जस्टिन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याशिवाय असिस्टंट कोच रॉडी एस्टविक आणि संघाचे डॉक्टर अक्षय मानसिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याआधी वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलसह आणखी दोघांना कोरोना झाला होता. त्याशिवाय वेस्ट इंडिजचा डेवोन थॉमस बोटाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे.
वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डानं काय म्हटलेय?
क्रिकेट वेस्टइंडीजने म्हटलेय की, " कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले तिन्ही खेळाडू पुढील सामन्यात खेळणार नाहीत. त्यासोबतच अन्य पाच जण विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टर त्यांची प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. या खेळाडूंना दहा दिवस अथवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे."
पाकिस्तान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज, गुरुवारी अखेरचा टी-20 सामना होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. पण संघातील खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे या विडिंजचा पाकिस्तान दौऱा चर्चेत आलाय. एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.