PAK vs BAN: लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघात बदल; बांगलादेशविरुद्ध दोन घातक खेळाडूंची संघात एन्ट्री!
Pakistan vs Bangladesh 2nd Test: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना रावळपिंडी येथे 30 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे.
Pakistan vs Bangladesh 2nd Test: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आता पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने संघात दोन बदल केले आहेत.
पाकिस्तान आणि बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना रावळपिंडी येथे 30 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. याआधी अबरार अहमद आणि कामरान गुलाम यांना संधी दिली आहे. अबरार अहमद हा घातक गोलंदाज आहे. तर कामरान गुलाम अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत आहे. अष्टपैलू आमिर जमाललाही संघात स्थान मिळाले आहे. मात्र त्याचा फिटनेस पाहूनच निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आले आहे. बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव केला होता. आता संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
कामरान गुलामची कारकीर्द-
कामरानबद्दल सांगायचे तर, त्याने पाकिस्तानसाठी वनडे पदार्पण केले आहे. पण अजून कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने 59 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कामरानने या फॉरमॅटमध्ये 4377 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 16 शतके आणि 20 अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 28 विकेट्सही घेतल्या आहेत.
अबरार अहमदची कारकीर्द-
अबरार अहमदबद्दल बोलायचे झाले तर त्याने पाकिस्तानसाठी 6 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 38 विकेट्स घेतल्या आहेत. अबरारने 3 टी-20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये 2 बळी घेतले. आता तो बांगलादेशविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत खेळताना दिसणार आहे. अबरारने 23 प्रथम श्रेणी सामन्यात 125 विकेट घेतल्या आहेत. त्याने 12 लिस्ट ए मॅचमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे.
पहिला कसोटी सामना कसा राहिला?
पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने 448 धावांवर 6 विकेट गमावून डाव घोषित केला. यादरम्यान पाकिस्तानकडून सौद शकीलने 141 आणि मोहम्मद रिझवानने 171 धावा केल्या. यानंतर बांगलादेशचा संघ 565 धावांवर ऑलआऊट झाला. मुशफिकुर रहीमने साडेआठ तासांहून अधिक काळ चाललेल्या मॅरेथॉन खेळीत 341 चेंडूंत एक षटकार आणि 22 चौकार मारून बांगलादेशला पहिल्या डावात 117 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला 146 धावांवर ऑलआउट केले आणि त्यांना विजयासाठी केवळ 30 धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग बांगलादेशने 6.3 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केला.
संबंधित बातमी:
झहीर खान लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात सामील; आयपीएल 2025 मध्ये दिसणार नव्या भूमिकेत!