MCA: एमसीएला धक्क्यांवर धक्के! अर्जुन तेंडुलकरनंतर आणखी एक खेळाडू सोडणार मुंबईची साथ
MCA: मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज 30 वर्षीय सिद्धेश लाडनं (Siddhesh Lad) देशांतर्गत क्रिकेटसाठी मुंबईच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय.
MCA: मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज 30 वर्षीय सिद्धेश लाडनं (Siddhesh Lad) देशांतर्गत क्रिकेटसाठी मुंबईच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणी त्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (Mumbai Cricket Association) ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) घेतलंय. सिद्धेश लाडचा हा निर्णय मुंबईच्या संघासाठी मोठा धक्का मानला जातोय. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) मुंबई रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाचं म्हणजे, सिद्धेश लाड आगामी काळात तो गोव्यासाठी राज्यस्तरीय क्रिकेट खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अर्जून तेंडूलकरनं देखील मुंबईचा संघ सोडल्यानंतर गोव्यासाठी आगामी काळात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतलाय.
लाडचं स्थान संशयाच्या भोवऱ्यात
लाड हा मुंबईच्या रणजी ट्र्रॉफी आणि दोन विजय हजारे चषकातील विजेत्या संघाचा भाग होता. परंतु, निवडकर्त्यांनी प्रतीक्षेत असलेल्या इतर तरूणांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचं स्थान संशयाच्या भोवऱ्यात दिसलं. त्यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या रेड-बॉल संघात त्याला स्थान मिळालं नाही. 2021 मध्ये खेळण्यात आलेल्या विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अलीमध्ये सिद्धेश लाड मुंबईच्या संघाचा भाग होता. मात्र, या स्पर्धेत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही.
सिद्धेश लाड काय म्हणाला?
"ज्या राज्यासाठी मी सर्व क्रिकेट सामने खेळलो, तेच राज्य सोडणे हा माझ्यासाठी एक कठीण निर्णय होता. मुंबईच्या संघाशी जुडीत अनेक आठवणी आहेत. परंतु, रणजी ट्रॉफी जिंकणं हा कधीच न विसरता येणारा क्षण आहे. इतर राज्यासाठी खेळणं कठीण असेल, पण मी आव्हान स्वीकारण्यास तयार आहे", अशा शब्दात सिद्धेश लाडनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. सिद्धेश लाड हा दिनेश लाड यांचा मुलगा आहे, ज्यांनी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण दिलं आहे.
सिद्धेश लाडची कारकीर्द
सिद्धेश लाडनं त्याच्या कारकिर्दीत 61 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 40 च्या सरासरीनं 4 हजार 58 धावा केल्या आहेत. तर, 39 लिस्ट ए क्रिकेट सामन्यात 1 हजार 140 धावा केल्या आहेत. तो मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा देखील भाग होता.
हे देखील वाचा-