(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MCA Election 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी आज मतदान, काळे की पाटील कोण मारणार बाजी?
आज मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) होत आहे. यासाठी 380 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Mumbai Cricket Association Election : आज मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) होत आहे. यासाठी 380 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
MCA निवडणुकीत एकूण मतदार 380
एमसीएचे एकूण 380 मतदार आहेत. त्यामध्ये मैदान क्लब्स 211, ऑफिस क्लब्स 78, स्कूल कॉलेज क्लब्स 40 आणि माजी कसोटीवीर 51 असे मतदार आहेत. त्यामुळं आता आजच्या या अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या निवडणुकीत मतदार कोण?
1) मैदान क्लब - 211
2) ऑफिस क्लब - 78
3) स्कूल/ कॉलेज कल्ब - 40
4) माजी कसोटीवीर - 51
एकूण मतदार 380
दरम्यान, MCA निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे विविध राजकीय पक्षांचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एका व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले होते. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे सर्वजण एका व्यासपीठावर आल्यानं राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा झाली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनबाबत महत्वाची माहिती
मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जायचं. ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर तसेच नवी मुंबईचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: