Jay Shah: जय शाहच एसीसीचे अध्यक्ष! एक वर्षासाठी वाढवला कार्यकाळ, एजीएममध्ये घेतला निर्णय
Jay Shah: जय शाह यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांच्याकडून एसीसीचा कारभार स्वीकारला होता.
Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांचा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) अध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवण्यात आलाय. कोलंबो येथे झालेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) एकमतानं हा निर्णय घेण्यात आलाय. जय शाह यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांच्याकडून एसीसीचा कारभार स्वीकारला होता.
एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करत जय शाह म्हणाले की, "आम्ही क्रिकेटचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. विशेष म्हणजे, महिला क्रिकेटला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी एसीसीद्वारा आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धेवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. एसीसीला आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही जोर लावणार आहोत", असंही त्यांनी म्हटलंय. जय शाहच्या विस्ताराचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी मांडला होता आणि सर्व एसीसी सदस्यांनी एकमतानं त्यांच्या नामांकनाला पाठिंबा दिला होता. ज्यानंतर जय शाह यांचा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवण्यात आलाय.
आशिया चषकाचं जयमानपद श्रीलंकेकडं
एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणखी दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. कतार क्रिकेट असोसिएशनला परिषदेत पूर्ण सदस्याचा दर्जा दिला जाईल.कतार क्रिकेटला पूर्वी फक्त सहयोगी दर्जा दिला जात होता. याशिवाय यावर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या तारखांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. यावेळी श्रीलंकेकडे त्याचे यजमानपद असेल.
सर्वाधिक आशिया चषक जिंकणाऱ्या संघात भारत अव्वल
आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा आतापर्यंत 14 वेळा आयोजित करण्यात आलीय. श्रीलंकेनं चार वेळा यजमानपद भूषवलंय. 2010 नंतर प्रथमच श्रीलंकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल. या स्पर्धेत भारतीय संघ सर्वाधिक सात वेळा चॅम्पियन ठरलाय. याशिवाय, श्रीलंका (5) आणि पाकिस्तानच्या संघानं दोनदा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय.
अखेरचा आशिया चषक भारतानं जिंकला
आशिया चषक 2018 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतानं तीन विकेट्स राखून चषकावर सातव्यांदा नाव कोरलं होतं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मानं ही स्पर्धा जिंकली होती.
हे देखील वाचा-
- IND W vs AUS W World Cup : चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया महिला संघानं केला भारतीय संघाचा पराभव, मेग लेनिंगची दमदार खेळी
- IND W vs AUS W World Cup : ऑस्ट्रेलिया महिला संघाची दमदार सुरुवात, 17 षटकात बिनबाद 111 धावा
- महिला वर्ल्ड कपमध्ये बेबी सेलिब्रेशन, एफी फ्लेचरचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha