(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jay Shah: रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे...; जय शहा यांनी सांगितली 3 आवडत्या दिग्गज क्रिकेटपटूंची नावं!
Jay Shah: रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. पण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचे आवडते दिग्गज क्रिकेटपटू दुसरेच आहेत.
Jay Shah: भारतीय क्रिकेट संघाचे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. पण बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांचे आवडते दिग्गज क्रिकेटपटू दुसरेच आहेत. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये जय शहा यांनी यावर भाष्य केलं आहे.
तुमचे 3 आवडते क्रिकेटर कोण आहेत?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी असल्याचं जय शहा यांनी सांगितले. सध्याचा काळ पाहता रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हे देखील माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या यादीत असल्याचं जय शहा यावेळी म्हणाले. सलग 100 कसोटी खेळणारे गावसकर हे जगातील पहिले खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्याने 774 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक 2749 धावा करण्याचा गावसकरांच्या नावावर आहे. सुनील गावसकरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 13 शतके झळकावली आहेत.
महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या चेन्नई संघाने यावेळी मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताचे कर्णधार असताना त्याने संघाला 2 विश्वचषक जिंकून दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकूण 3 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो 200 कसोटी आणि 463 वनडे खेळला. त्याच्या नावावर कसोटीत 51 शतके आणि 68 अर्धशतके आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 49 शतके आणि 96 अर्धशतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. याशिवाय त्याने कसोटीत 46 आणि एकदिवसीय सामन्यात 154 विकेट्स घेतल्या आहेत.
टी-20 विश्वचषक कोण जिंकणार?
टी-20 विश्वचषकाच्या जेतेपदासाठी जय शहा यांनी 4 संघांची नावं घेतली आहे. यामध्ये पहिलं नाव भारताचं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. भारत व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज प्रबळ दावेदार असू शकतात, असं जय शहा यांनी सांगितले. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे मोठे संघ असल्याचं जय शहा म्हणाले. दरम्यान, वेस्ट इंडिजमध्ये दोनवेळा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे, तर ऑस्ट्रेलियाने 2021 साली टी-20 विश्वचषक पटकावलं होतं. मात्र जय शहा यांनी वेस्ट इंडिज संघाचं नाव घेतल्याने अनेक क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.