आता झहीर खान गौतम गंभीरची जागा घेणार?; अहवालातून धक्कादायक खुलासा
Zaheer Khan IPL 2025:गौतम गंभीर सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
Zaheer Khan IPL 2025: गौतम गंभीर सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी, गौतम गंभीर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक म्हणून दिसला होता आणि त्याआधी लखनौ सुपर जायंट्सच्या संघाची मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली होता. गौतम गंभीरनंतर लखनौच्या फ्रँचायझीमध्ये कोणताही नवीन मार्गदर्शकाची निवड करण्यात आलेली नाही.
लखनौ सुपर जायंट्समध्ये मार्गदर्शकांव्यतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षकाचीही कमतरता आहे. भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षकपदी मॉर्नी मॉर्केलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता लखनौ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलही पदावरुन पायऊतार झाला आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. झहीर खानची (Zaheer Khan) लखनौच्या प्रशिक्षकपदी दिसण्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, झहीर खान आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये चर्चा सुरू आहे. तथापि, लखनऊ सुपर जायंट्स किंवा झहीर खान यांनी या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.
झहीर खानची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द-
झहीर खान हा वेगवान गोलंदाज होता जो भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला होता. झहीरने 2000 ते 2014 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्याने टीम इंडियासाठी 92 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत झहीरने 32.94 च्या सरासरीने 311 विकेट घेतल्या. याशिवाय, भारतीय वेगवान गोलंदाजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 29.43 च्या सरासरीने 282 विकेट घेतल्या, ज्यामध्ये 5/42 ही सर्वोत्तम गोलंदाजी होती. आंतरराष्ट्रीय टी-20 च्या उर्वरित 17 डावांमध्ये त्याने 26.35 च्या सरासरीने 17 बळी घेतले. या कालावधीत त्याने 7.63 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या. झहीर खानचा T20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोत्तम गोलंदाजीचा आकडा 4/19 होता. याशिवाय खानला आयपीएलचाही चांगला अनुभव आहे. त्याने 100 आयपीएल खेळले आहेत, ज्यामध्ये झहीर खानने 102 विकेट घेतल्या आहेत. झहीर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. 2017 मध्ये त्याने शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.
नकल बॉलची सुरुवात
2004-05 दरम्यान झहीर खानला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करावा लागला होता. ज्यामुळं त्याला संघाबाहेरही पडावं लागलं होतं. त्यावेळी झहीरनं नकल बॉलचा शोध लावून त्यासाठी जोरदार सराव केला. भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर त्यानं नकल बॉलचा प्रयोग केला आणि यशस्वीही ठरला. झहीर खानची नकल बॉल आजही प्रसिद्ध आहे. फलंदाजांना चकवा देण्यासाठी गोलंदाजांकडून नकल बॉलचा वापर केला जातो.
क्रिकेटसाठी इंजिनीअरिंग सोडली
झहीर खानचा जन्म 7 ऑक्टोबर 1978 मध्ये महाराष्ट्राच्या श्रीरामपूर येथे झाला. झहीर खानची क्रिकेटर बनण्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. झहीरचं सुरुवातीचं शिक्षण श्रीरामपूर येथील हिंद सेवा मंडळ नवीन मराठी प्राथमिक शाळेत झालं. यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केजे सोमय्या माध्यमिक विद्यालयात केलं. त्यानंतर त्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. पण त्यांचे मन क्रिकेटमध्ये स्थिरावलं. झहीरची ही आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला सल्ला दिला की, देशात अनेक इंजिनिअर आहेत, तू वेगवान गोलंदाज बन.' त्यानंतर झहीर खानच्या क्रिकेटर बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.