(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Final : आयपीएलमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याआधी नुकसान
CSK vs GT IPL 2023 Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडियातील काही खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत.
IPL 2023 Reserve Day, WTC Final : अहमदाबादमध्ये रविवारी पडलेल्या पावसामुळे आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज, 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएलचा महाअंतिम सामना आज राखीव दिवशी म्हणजेच 'रिझर्व्ह डे' (Reserve Day) खेळवला जाईल. दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना लांबल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
आयपीएलमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना सोमवारी राखीव दिवशी खेळला जाईल. हा सामना रविवारी होणार होता. पण, पावसामुळे हा सामना आता सोमवारी खेळवला जाणार आहे. दुसरीकडे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून हा सामना रंगणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याआधी नुकसान
आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी टीम इंडियाची तयारी सुरु झाली आहे. बहुतेक भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले असून त्यांनी चॅम्पियनशिपसाठी तयारी सुरु केली आहे. शुभमन गिल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि अजिंक्य रहाणे हे सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये टीम इंडियाचे सदस्य आहेत. पण, आयपीएचा अंतिम सामना अद्याप शिल्लक असल्यामुळे हे चार खेळाडू अजून इंग्लंडला पोहोचू शकलेले नाहीत. यामुळे टीम इंडियाचं नुकसान होणार आहे.
खेळाडू ठरलेल्या वेळी इंग्लंडला रवाना होऊ शकणार नाही
शुभमन, रहाणे, शमी आणि जडेजा यांची लंडनसाठी तिकिटे बुक झाली होती. पण आता आयपीएलचा सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार असल्यामुळे हे चार खेळाडू ठरलेल्या वेळी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होऊ शकणार नाहीत. राखीव दिवसामुळे आयपीएलचा अंतिम सामना आणखी एक दिवस पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे हे खेळाडू दोन दिवस उशिरा इंग्लंडला पोहोचण्याची शक्यता आहे.
खेळाडूंना कसोटी सामन्याच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही
एकीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. तर, दुसरीकडे आयपीएल अंतिम सामन्याच्या प्रतीक्षेत असलेले शुभमन, रहाणे, शमी आणि जडेजा हे खेळाडू कसोटी सामन्याच्या सरावासाठी इंग्लंडला वेळेवर पोहोचू शकणार नाहीत.
आयपीएल संपल्यावर खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणार
विशेष म्हणजे, गुजरात टायटन्सचे खेळाडू शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. गिलने या मोसमात तीन शतकं झळकावली आहेत. या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक धावाही केल्या आहेत. तर मोहम्मद शमीने यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाकडून रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे.