Indian Cricket Team: रोहित, कोहली, बुमराहला टी-20 मधून डच्चू मिळणार?; पुढील लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी अन् वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
Indian Cricket Team: भारतीय संघाला जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
Indian Cricket Team: सध्या आयसीसी टी 20 विश्वचषक (World Cup 2024) स्पर्धा सुरु आहे. यानंतर भारतीय संघाला जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. याआधी टीम इंडिया टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेला जाणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआय नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते. तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसारख्या (Virat Kohli) वरिष्ठ खेळाडूंना टी-20 फॉरमॅटमधून डच्चू दिला जाऊ शकतो. हे खेळाडू कसोटी आणि वन-डे फॉरमॅटवर लक्षकेंद्रित करतील.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून सलग क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे या वरिष्ठ खेळाडूंना टी-20 मधून ब्रेक दिला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे वरिष्ठ खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करतील. ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी सुरू करतील. या कारणामुळे वरील खेळाडूंना झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात येईल.
Rohit Sharma, Virat Kohli, Jasprit Bumrah will be focusing on the WTC & Champions Trophy after the T20I World Cup 2024. [TOI]
— Johns. (@CricCrazyJohns) June 19, 2024
- Youngsters set to travel for the Zimbabwe tour. pic.twitter.com/t6A8T9b8h0
2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहली या फॉरमॅटमध्ये बराच काळ संघाबाहेर होता. कोहलीने नोव्हेंबर 2022 मध्ये ॲडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 सामना खेळला होता. यानंतर तो बराच काळ टीम इंडियातून बाहेर राहिला. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याला पुन्हा संधी मिळाली. कोहली जानेवारी 2024 मध्ये पुन्हा टी-20 संघात सामील झाला. या काळात तो काही काळ वैयक्तिक कारणांमुळे देखील उपलब्ध नव्हता.
अभिषेक, रियानला मिळणार संधी?
टीम इंडिया 6 जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. यासाठी अभिषेक शर्मा आणि रियान पराग या युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उपलब्ध असेल.