World Cup 2023 : टीम इंडियापुढे पुन्हा तेच संकट! विश्वचषकात बसू शकतो मोठा फटका
World Cup 2023 Latest News : यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होणार आहे, त्यामुळे टीम इंडियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जातेय.
World Cup 2023 Latest News : यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होणार आहे, त्यामुळे टीम इंडियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जातेय. पण भारतीय संघापुढे जुने संकट पुन्हा उभारलेय. होय.. 2019 मध्ये जे संकट होतं, तेच संकट पुन्हा एकदा भारतीय संघासमोर उभं राहिलेय. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार ? हा प्रश्न टीम इंडियाला सतावत आहे. मागील वर्षभरात या स्थानासाठी भारतीय संघाने चार खेळाडूंना संधी दिली आहे, पण समाधान मिळालेच नाही. खेळाडूंकडून प्रदर्शन हवे तसं झालं नाही.
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचं दमदार प्रदर्शन, पण....
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चौथ्या स्थानावर दमदार फलंदाजी केली. पण इतर खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. पण पंत आणि अय्यर हे दोन्ही फलंदाज दुखापतग्रस्त आहेत. ऋषभ पंत कधी मैदानावर परतणार ? याबाबत कोणतीही अपडेट नाही. श्रेयस अय्यर एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. आकडे पाहिले तर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी 8-8 सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. श्रेयस अय्यर याने दोनवेळा अर्धशतकी खेळी केली आहे. 57 च्या सरासरीने 342 धावा केल्या आहेत.
ऋषभ पंत याने चौथ्या क्रमांकावर 37.43 च्या सरासरीने 262 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत याने दोन वेळा अर्धशतके झळकावली आहेत. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय चौथ्या क्रमांकावर ईशान किशन, सूर्यकुमार यादव, वाशिंगटन सुंदर, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजी केली. या सर्वांना लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही.
टीम इंडियाचं जुनेच दुखणं -
चौथ्या क्रमांकाची अडचण भारतीय संघाची जुनीच आहे. 2019 च्या विश्वचषकातही टीम इंडियाला याचा मोठा फटका बसला होता. विश्वचषकाच्या आधी अंबाती रायडू याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवले होते. पण विश्वचषकात विजय शंकर याला संधी देण्यात आली. विजय शंकर याने निराशाजनक कामगिरी केली. दुखापतीमुळे विजय शंकर स्पर्धेतून बाहेर गेला होता. ऋषभ पंत याने त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
विश्वचषक कधी ?
यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार आहे. विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. प्रत्येक संघाचे 9 - 9 सामने होणार आहे.