(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Cricket Team Head Coach: गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुक; महत्वाची अपडेट आली समोर
Gautam Gambhir On Indian Cricket Team Head Coach: 29 मे हा मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिले आहेत.
Gautam Gambhir On Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. 29 मे हा मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर, अॅन्डी फ्लॉवर आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी वैयक्तिक कारण देत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रस दाखवला नाही. बीसीसीआयकडून गौतम गंभीरचा प्रशिक्षकपदासाठी विचार होत असल्याची माहिती समोर आली होती. आता गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाचा कारभार सांभाळण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दैनिक जागरनने याबाबत वृत्त दिलं आहे. मात्र बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच नवीन प्रशिक्षकाची निवड होत नाही, तोपर्यंत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकपदाची भूमिका सांभाळणार आहे.
Gautam Gambhir is interested in the head coach post of the Indian team. [Abhishek Tripathi from Dainik Jagran] pic.twitter.com/pbRoiPcNHx
— Johns. (@CricCrazyJohns) May 25, 2024
बीसीसीआयने गंभीरला केली होती विनंती-
मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने गौतम गंभीरसोबत संपर्क साधला होता, असा दावा ESPN क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. गौतम गंभीर सध्या आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून काम पाहत आहेत. आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये स्पष्ट चर्चा होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. तर टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 27 मे आहे.
एकाही ऑस्ट्रेलियनला प्रशिक्षकपदाची ऑफर दिलेली नाही-
जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलतो, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा प्रतिष्ठेचे कोणतेही पद असू शकत नाही. टीम इंडियाचे जगभरात मोठ्या संख्येने चाहते आहेत. त्यामुळे बीसीसीआय योग्य उमेदवाराची निवड करेल. बीसीसीआयने एकाही ऑस्ट्रेलियनला प्रशिक्षकपदाची ऑफर दिलेली नाही. व्हायरल होत असलेलं वृत्त चुकीचं आहे, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं.
नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?
टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.