Asia Cup : आशिया कप 2025 चं यजमानपद भारताकडे, पाकिस्तान सहभागी होणार? टी 20 वर्ल्ड कपपूर्वी रणसंग्राम
Asia Cup : 2025 मध्ये होणाऱ्या टी 20 आशिया कपचं आयोजन भारत करणार आहे. तर, 2027 च्या वनडे आशिया कपचं आयोजन बांगलादेश करणार आहे.
नवी दिल्ली : महिला आशिया कप स्पर्धा श्रीलंकेत पार पडली. भारत (Team India) आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. आशिया कपच्या (Asia Cup 2025) पुरुष गटातील स्पर्धेबाबत अपडेट समोर आली आहे. भारत आगामी आशिया कप 2025 चं आयोजन करणार आहे. बांगलादेशकडे 2027 च्या आशिया कपचं आयोजन दिलं गेलं आहे.
भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. 2025 मध्ये होणारी आशिया कप स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. 2026 च्या टी 20 वर्ल्डकपची पूर्व तयारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 2027 चा आशिया कप बांगलादेशमध्ये होणार असून ती स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. 2027 ला दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची पूर्व तयारी म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
आशिया क्रिकेट कंट्रोल कडून आशिया कप स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आशिया कप स्पर्धेत भारताचं वर्चस्व कायम राहिलं आहे. भारतानं 8 वेळा आशिया कपचं विजेतेपद मिळवलं आहे. यामध्ये 7 एकदिवसीय आणि एका टी 20 स्पर्धेचं विजेतेपद भारताला मिळालं आहे. भारतानं श्रीलंकेनं 6 वेळा विजेतेपद मिळवलेलं आहे. भारत आणि श्रीलंकेनंतर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्ताननं 2 वेळा विजेतेपद मिळवलं आहे.
भारतानं 2023 च्या आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं होतं. भारतानं श्रीलंकेला 15.2 ओव्हरमध्ये 50 धावांवर बाद केलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं ती मॅच 10 विकेटनं जिंकली होती.
पाकिस्तान भारतात येणार?
पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत घ्यावेत,असी भूमिका बीसीसीआयनं घेतली आहे. आयसीसीनं त्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. जर, भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तनला गेला नाही, तर, आगामी आशिया कपमध्ये पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येईल का प्रश्न कायम आहे.
भारताकडून टी 20 वर्ल्ड कपची तयारी सुरु
2026 च्या आयसीसी टी 20 वर्ल्डकपचं आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्याकडून केलं जाणार आहे. आगामी टी20 वर्ल्डकपची तयारी म्हणून सूर्यकुमार यादवकडे नेतृत्त्व देण्यात आलं आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या मालिकेत भारतानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू नसल्यानं युवा खेळाडूंना सोबत घेत गौतम गंभीरकडून संघाची बांधणी सुरु करण्यात आलेली आहे.
संबंधित बातम्या :
'मला कर्णधार व्हायचं नाही...'; श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव काय बोलून गेला?