'मला कर्णधार व्हायचं नाही...'; श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव काय बोलून गेला?
Ind vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवचं एक विधान समोर आलं आहे.
Ind vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने (Ind vs SL) 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. टी-20 फॉरमॅटचा नवीन कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) ही विजयी सुरुवात केली आहे. याचदरम्यान सूर्यकुमार यादवचं एक विधान समोर आलं आहे.
श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर बीसीसीआय टीव्हीने सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया विचारली. यावर मला कर्णधार नाही, लीडर व्हायचे आहे. आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय, ते पाहून खूप आनंद होतोय. मला संघात कर्णधाराचा टॅग नकोय, तर मी लीडर म्हणून स्वत:ला विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. मी या मालिकेच्या आधीच सांगितले होते की आम्ही कशा पद्धतीने क्रिकेट खेळणार आहोत. हाच आक्रमक पवित्रा आम्ही पुढेही कायम ठेवणार आहोत, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
शेवटच्या सामन्याच्या निकालाने काहीही फरक पडणार नाही-
आता या मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या निकालाने काही फरक पडणार नाही, तेव्हा 'राखीव बेंच'मधील काही खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सूर्यकुमारला विचारण्यात आला. तर यावर'आम्ही बसून निर्णय घेऊ. आमच्या खेळाडूंनी कठीण परिस्थितीत खूप चांगली कामगिरी केली, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.
सूर्यकुमार यादवचा संपूर्ण व्हिडीओ-
🎥 Showcasing some of #TeamIndia's stars from first T20I 🙌#SLvIND | @surya_14kumar | @akshar2026 | @ParagRiyan pic.twitter.com/LRG1ZiIiQa
— BCCI (@BCCI) July 28, 2024
यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी-
सलामीवीर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. मात्र यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी केली. यानंतर मथिशा पाथिरानाने सूर्यकुमारला झेलबाद केले. सूर्यकुमारने 12 चेंडूत 26 धावा केल्या. संघाच्या 65 धावा असताना टीम इंडियाला तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल 15 चेंडूत 30 धावा करत बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने 9 चेंडूत 22 धावा केल्या. भारताने या विजयासह टी-20 मालिका देखील जिंकली आहे.
श्रीलंकेकडून कुशल परेराच्या सर्वाधिक धावा-
श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कुशल परेराने सर्वाधिक 53 धावा केल्या. पाथुम निसांकाने 32, कुशल मेंडिसने 10, कामिंदू मेंडिसने 26, तर चारिथ असालंकाने 14 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग, अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताकडून रवी बिश्नोईने 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग, अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.