(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी बाप, आता मुलाविरोधात विराट कोहली उतरणार मैदानात, याआधी सचिन तेंडुलकरने केलाय 'हा' पराक्रम
India vs West Indies Test Series : बुधवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
India vs West Indies Test Series : बुधवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेचा पहिला कसोटी सामना डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर विराट कोहली एका खास क्लबमध्ये सामील होणार आहे. क्रिकेट करिअरमध्ये बाप आणि मुलाविरोधात खेळणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहलीचे नाव होणार आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर याने हा पराक्रम केला आहे.
विराट कोहलीने 12 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या संघात शिवनारायण चंद्रपॉल होता... आता वेस्ट इंडिजच्या संघात शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेजनारायण खेळत आहे. विराट कोहली बाप आणि मुलाविरोधात खेळणारा भारताचा दुसरा खेळाडू होणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर याने असा पराक्रम केला आहे. 1992 मध्ये सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या ज्योफ मार्श याच्याविरोधात खेळला होता. त्यानंतर 2011-12 मध्ये सचिन आणि ज्योफ मार्शचा मुलगा शॉन मार्श याच्याविरोधात मैदानात उतरला. विराट कोहली आता सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये सामील होणार आहे.
तेजनारायण चंद्रपॉलची कामगिरी कशी राहिली?
शिवनारायण चंद्रपॉल याने भारताविरोधात नेहमीच खोऱ्याने धावा काढल्या आहेत. मुलगा तेजनारायण कशी कामगिरी करतो, याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. तेजनारायण सलामी फलंदाजाची भूमिका पार पाडतो. आतापर्यंत तेजनारायण याने दमदार प्रदर्शन केलेय. तेजनारायण याने सहा सामन्यात 11 डावात 45.30 च्या सरासरीने 453 धावा काढल्या आहेत. यादरम्यान तेजनारायण याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलेय. तेजनारायण याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 207 इतकी आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड -
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 22 सामन्यात विजय मिळवलाय. तर 30 सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. 46 सामने अनिर्णित राहिलेत. 2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिजचा कसोटी संघ -
क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डिसिल्वा, शेनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.