Ind vs Pak : आज रंगणार हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना! जाणून घ्या किती वाजता होणार सुरू? कुठे पाहू शकता LIVE
U19 Men's Asia Cup 2024 India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 बाबत वाद सुरूच आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
India vs Pakistan U19 Men's Asia Cup 2024 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 बाबत वाद सुरूच आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. त्याच वेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी देखील आपल्या आग्रहावर ठाम आहे. यादरम्यान, आज भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सामना रंगणार आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांना या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे.
खरंतर, 30 नोव्हेंबर 2024 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. म्हणजेच आज भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना U19 आशिया कप 2024 मधील दुसरा सामना असेल ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गट-A मध्ये ठेवण्यात आले आहेत. जरी या स्पर्धेची सुरुवात 29 नोव्हेंबरपासून अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार असली, आज सर्वात मोठा सामना खेळवला जाईल. दुबई येथे हा सामना रंगणार आहे.
2024 ACC अंडर-19 आशिया कपमध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, जपान, यूएई, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, जपान आणि संयुक्त अरब अमिराती यांना ‘अ’ गटात तर अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ यांना ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे.
दुबईशिवाय शारजाह येथेही या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. 8 डिसेंबर रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. अंडर-19 आशिया कपमध्ये भारतीय संघाची कमान मोहम्मद अमानकडे असेल तर साद बेग पाकिस्तान संघाचे नेतृत्व करेल. अलीकडेच इमर्जिंग आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले होते. टीम इंडियाने हा सामना जिंकला होता.
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कप सामना टीव्हीवर कुठे आणि किती वाजता पाहायचा?
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 पुरुषांच्या आशिया कप सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. मोबाईलवर हा सामना Sony LIV ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रसारित केला जाईल. जो भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे -
भारतीय अंडर-19 संघ : आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले (उपकर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पानगालिया (विकेटकीपर), अनुराग कवडे (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद अनन, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.
पाकिस्तान अंडर-19 संघ : साद बेग (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोहम्मद अहमद, हारून अर्शद, तय्यब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नावेद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रझा, मोहम्मद रियाजुल्ला , अब्दुल सुभान, फरहान युसूफ, उमर झैब.